ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन

पुणे | Pune

अनाथांसाठी सेवाकार्य करणार्‍या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे आज रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या...

महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील गॅलेक्झी हॉस्पिटलमध्ये (Galaxy Hospital) उपचार सुरू होते. ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताईंना तब्बल 750 हून अधिक पुरस्कारांनी (Awards) गौरवण्यात आले आहे.

सिंधुताई यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला होता, तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले होते.

मुळातच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवले. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बालसदन संस्थेची स्थापना केली होती.

1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील, यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक-युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे 1050 मुले या संस्थेत राहिलेली आहेत. सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स अ‍ॅन्ड प्रॉडक्शनचा ‘अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.

‘देशदूत’शी आपुलकीचे संबंध

‘देशदूत परिवारा’शी सिंधुताई सपकाळ यांचे आपुलकीचे संबंध होते. ‘देशदूत ज्ञानवंत-गुणवंत पुरस्कारा’च्या एका सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून त्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांचे विचार ऐकण्यासाठी सभागृह श्रोत्यांनी खच्चून भरले होते. सिंधुताईंच्या भावस्पर्शी भाषणाने श्रोते भारावले होते.

सिंधुताई यांनी स्थापलेल्या संस्था

बालनिकेतन हडपसर, पुणे, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा, अभिमान बालभवन वर्धा, गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा (गोपालन), ममता बालसदन, सासवड, सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com