शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे कालवश

jalgaon-digital
2 Min Read

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आणि शेतकर्‍यांचे मार्गदर्शक माधवराव खंंडेराव मोरे (88) ( Madhavrao More ) यांचे त्यांच्या निवासस्थानी आज (दि.2) रात्री साडे सातच्या सुमारास निधन झाले. आठ दिवसांपूर्वी मोरे यांची प्रकृती खालावली होती. पिंपळगाव बसवंतमधील संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. अश्विनकुमार मोरे, सुमन हॉस्पिटलचे डॉ. रोहन मोरे, डॉ. संदीप वाघ यांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत होते. मात्र आज सकाळपासून माधवराव मोरे उपचाराला फारसा प्रतिसाद देत नव्हते. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोरे यांच्या पार्थिवावर पिंपळगाव बसवंत येथे पाराधरी नदीकाठी उद्या (दि.3) सकाळी 9.30 वाजता अंंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माधवराव मोरे यांनी 1980-81 च्या काळात शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या सोबतीने संघटनेची स्थापना करून शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभारले होते. आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर केंद्र सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती.

ऊस आणि कांद्याला रास्त भाव मिळावा यासाठी महाराष्ट्रभर शरद जोशी व माधवराव मोरे यांच्या नेतृत्वात रेल रोको, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन चिरडण्यासाठी त्यावेळी सरकारकडून लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार करण्यात आला होता. लाठीमारात माधवराव मोरे यांना एसआरपी फोर्सने लक्ष्य केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तरीही शेतकरी आंदोलनाची धार कमी न होता वाढतच गेली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी शरद जोशी व माधवराव मोरे यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. प्रकृतीच्या कारणास्तव माधवराव मोरे यांनी 1986 पासून शेतकरी आंदोलनातून माघार घेतली होती. तरीही ते शेवटपर्यंत संंघटनेच्या विचारांशी बांधील होते. शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *