
नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्हा परिषदेतफे आता आदर्श गाव योजना सुरू करण्यात येणार असून त्यासाठी 51 गावांची निवड करण्यात आली आहे.
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा परिषदेमधील सर्व पंचायत समित्यांमधून किमान 3 ग्रामपंचायतींची आदर्श गाव योजनेसाठी निवड करून सन 2023-24 या वर्षापासून केंद्र शासन, राज्य शासन व शासकीय सर्व विभागांच्या ग्रामविकासाशी संबंधित सर्व योजना राबवून सर्वसमावेशक विकास करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून त्यानुसार आदर्श गाव योजना सुरू करण्याबाबत सुचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या आहेत.
यासाठी सन 2023-24 या पहिल्या वर्षाकरिता स्मार्ट व्हिलेज योजना आणि आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना यात मागील 3 वर्षातील तालुक्यात पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतींची आणि सांसद आदर्श गाव योजना मधील 51 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.
या आहेत योजना
घरकुल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, गावातील सर्व शासकीय इमारतींमध्ये शौचालय बांधणे, गावाचे जल अंदाजपत्रक, सर्व घरांना 100टक्के नळ जोडणी, वृक्ष लागवड, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, गावात 100टक्के पथदीप एलईडी सौर ऊर्जेवर होणार, पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार, मासिक सभा, ग्रामसभा, महिला सभा यांची प्रभावी अमलबजावणी, लसीकरण, किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण, आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आधार कार्ड, दिव्यांग कार्ड यांचे 100 टक्के वाटप
या गावांचा समावेश
नाशिक - दरी, मुंगसरे, कोटमगाव, गणेशगाव, माणिकखांब
इगतपुरी - शिरसाठे, मोडाळे, नागोसली
त्र्यंबकेश्वर - वेळुंजे, काचुर्ली, आंबोली, वाघेरा
पेठ - कोपुर्ली बु., शेवखंडी, बोरवठ
सुरगाणा - बुबळी, हातरुंडी, म्हैस खडक
दिंडोरी - करंजवण, कोल्हेर, गोंडेगाव
कळवण - सुळे, नांदुरी, मेहदर
बागलाण - पिंपळदर, रातीर, नवे निरपूर
देवळा - वरवंडी, खालप, माळवाडी
चांदवड - राजदेरवाडी, हिरापूर, नन्हावे, रायपूर
मालेगाव - निळगव्हाण, बेळगाव, मुंगसे
नांदगाव - बोराळे, श्रीरामनगर, भालुर
येवला - महालखेडा, सायगाव, एरंडगाव खु
निफाड - थेरगाव, आहेरगाव, साकोरे मिग
सिन्नर - वडांगळी, चिंचोली, दातली, किर्तांगळी, ठाणगाव