photo यंदाच्या वर्षातील सर्वात जोरदार पाऊस

jalgaon-digital
2 Min Read

Video उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस शहाद्यात

शहादा | प्रतिनिधी

शहादा शहरासह तालुक्यात काल सायंकाळी ७ वाजेपासून विजेच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यंदाच्या वर्षातील हा सर्वात जोरदार पाऊस आहे.

या पावसामुळे शहादा शहर जलमय झाले. काल दि.७ ऑगस्ट रोजी शहादा शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले. शहादा शहरातील अनेक भागात पाणी साचले.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून बायपासपर्यंत जाणाऱ्या नवीनच तयार केलेल्या डोंगरगाव रस्त्याला यंदाही नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते.पाटाचे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे.

नवीन गटारी कुचकामी ठरल्या आहेत. शहरातील जुन्या तहसिल कार्यालयाच्या जागी नविन प्रांत कार्यालय आताच बनविण्यात आले आहे. त्याच्या आवारात प्रचंड पाणी साचले आहे.

प्रांत कार्यालयाला तलावाचे स्वरुप आले आहे.शहरातील न्यायालय आणि प्रांताधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या दोन्ही कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे ओले झाल्याची भीती व्यक्त केली जात आहेे.

शहादा न्यायालयांच्या सर्व इमारतीत पाणी शिरले आहे. सुमारे दोन फुट पाणी न्यायालयात शिरले असून न्यायालय आवाराला पाण्याचा वेढा पडला आहे. यामुळे न्यायालयाचे काम ठप्प आहे.

बार असोसिएशनतर्फे याबाबत प्रशाशनाला निवेदन देण्यात येणार आहे.शहरात मुसळधार पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत, स्टेट बँक परिसर, शासकीय विश्रामगृह, नगरपालिकेच्या इमारती जवळील परिसर व दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

या पावसामुळे शहराच्या वीजपुरवठा खंडित झाला आहे. शहरात साचलेल्या पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावे लागत आहे. शहादा शहरासह तालुक्यात काल सायंकाळी ७ वाजेपासून ते रात्री ३ वाजेपर्यंत विजेच्या प्रचंड कडकाडाटासह मुसळधार पाऊस झाला.

या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वृक्ष उन्मळुन पडले असुन ते बाजुला करण्याचे काम सुरू आहे.पावसामुळे नगरपालिकेचा भोंगळ कारभार एकदा पुन्हा समोर आला.

शहरातील पाण्याच्या निचर्‍याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *