ब्रम्हगिरीसह परिसराला सुरक्षा कवच

त्र्यंबकेश्वरचा 96.97 चौरस कि.मी परिसर संवर्धन राखीव क्षेत्र
ब्रम्हगिरीसह परिसराला सुरक्षा कवच

नाशिक । मोहन कानकाटे Nashik

गोदावरीचे ( Godavari River ) उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या( Trimbakeshwar ) ब्रम्हगिरीसह 96.97 चौरस किलोमीटरचा परिसर 'संवर्धन राखीव क्षेत्र' (Conservation Reserve Area)म्हणून जाहीर करण्यात आल्यामुळे ब्रम्हगिरी पर्वतासह आसपासच्या परिसराला सुरक्षा कवच प्राप्त झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातून दहा प्रस्ताव संवर्धन राखीव क्षेत्र व्हावे म्हणून सादर करण्यात आले होते. त्यापैकी तीन तालुक्यांच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले.यामध्ये त्र्यंबकेश्वरमधील 31 इगतपुरीतील 28 आणि कळवणच्या 30 गावांतील क्षेत्राचा समावेश करण्यात आला.

यानंतर राज्य सरकारने राजपत्राद्वारे सूचना काढत त्र्यंबकेश्वर परिसरातील 96.97 चौ.किलोमीटर क्षेत्र वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार ङ्गसंवर्धन राखीव क्षेत्रफ म्हणून जाहीर केले आहे. त्यानुसार उत्तरेला - वायघळपाडा,वाघेरा, कोरीवाज, चिंचवड, जातेगांव बु. पूर्वेला - कोने, गोधड्याचापाडा, माळेगांव दक्षिणेला - गोरठाण, वेळुंजे आणि पश्चिमेला - वरसविहिर, खरवळ, गडदावणे अशा सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत.

त्र्यंबकेश्वरचा 96.97 चौ.किमी परिसर संवर्धन राखीव क्षेत्र जाहीर झाल्यामुळे वन्यप्राण्यांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. कारण बिबटे, ससा, हरीण यासह अन्य वन्यप्राण्यांचा परिसरात वावर वाढल्याने त्यांची शिकार होत असते. परंतु, आता हा परिसर संवर्धन राखीव क्षेत्र झाल्याने दुर्मिळ वनस्पती व वन्यप्राण्यांचे संरक्षण होईल.

तसेच संवर्धन राखीव क्षेत्र झाल्याने वनविभागाच्या परिसरात जनावरांच्या चराईला देखील आळा बसेल.कारण या परिसरातील शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह शेतीसह दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी अगोदर वनविभागाच्या पडीक जमिनीवर जनावरे चारत होते. परंतु,आता याच पडीक जमिनीच्या क्षेत्रापैकी काही क्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्र जाहीर झाल्याने शेतकर्‍यांना आपल्याच जमिनीवर जनावरे चारावी लागणार आहेत.

त्र्यंबक लगतचा बराचसा भाग डोंगर दर्‍यासह जंगली भाग असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड होते. या परिसरात सागवानचे लाकूड जास्त असल्याने रात्रीच्या वेळी ग्रामीण भागातील नागरिक लाकडी घरे किंवा शेतीची अवजारे बनविण्यासाठी लाकडे तोडण्याकरिता येत असतात. परंतु, आता या भागात वनविभागाचे नियंत्रण राहणार असल्याने वृक्षतोड थांबण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

तसेच गेल्या वर्षी त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध डोंगर उत्खनन झाले होते. त्यावेळी त्र्यंबकेश्वर परिसरातील नागरिक, वारकरी संप्रदाय व हिंदुत्ववादी संघटनांसोबतच पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत ट्विटरवर ङ्गसेव्ह ब्रह्मगिरी मोहीमम चालवली होती.त्यानंतर तातडीने त्यावेळचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकार्‍यांना उत्खनन थांबविण्याचे आदेश दिले होते.तर अवैध उत्खनन प्रकरणी तलाठी, कोतवाल यांना निलंबित करण्यात आले होते.तसेच मंडल अधिकारी आणि तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

दरम्यान, त्यानंतर आता हा परिसर संवर्धन राखीव क्षेत्र झाल्याने येथील डोंगरदर्‍या सुरक्षित राहण्यास आणि ब्रह्मगिरीची हिरवळ व गोदावरीचे पावित्र्य टिकविण्यासाठी परिसरातील नागरिकांसह पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला मोठे यश आले आहे.

उत्खननाला बसणार चाप

राखीव संवर्धन क्षेत्र झाल्याने या परिसरात होणार्‍या अवैध उत्खननाला चाप बसण्याची शक्यता आहे. कारण काही भागांत रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन होते. परंतु, त्यावेळेस कुणावरही कारवाई केली जात नाही.

या गावांचा समावेश

त्र्यंबकेश्वरसह, अंबोली, वाघेरा, गोरठाण, अंबई, काचुर्ली, तळेगांव त्र्यंबक, वरसविहिर, वेळूंजे, कळमुस्ते, उभ्रांडे, हर्षवाडी, टाकेहर्ष, चंद्र्याची मेट, हुंब्याची मेट, आव्हाटे, आळवंड, अस्वली हर्ष, झारवड खु, दापुरे, मेटघर किल्ला, धाडोशी, कोजुली, पेगलवाडी, भिलमाळ, पहीने, मुळेगाव, वाढोली, डहाळेवाडी, गोधड्याचापाडा कोरीवाज, या गावांतील विविध गटांचा समावेश आहे.

संवर्धन राखीव क्षेत्र म्हणजे काय ?

वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत एखादे क्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यास तेथील अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्पांना मान्यता मिळते. तसेच स्थानिकांचे हक्क अबाधित राहतात. याशिवाय वन्यजीव भ्रमणमार्ग किंवा अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानांच्या कवच क्षेत्रांना संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यात येतो.

वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम 1972 नुसार त्र्यंबकेश्वरचा 96.97 चौरस किलोमीटरचा परिसर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आता या भागातील वन्यप्राणी व वन्यजीव यांचे संरक्षण करण्यात येईल. तर जंगली भागात अवैधरित्या होणार्‍या वृक्षतोडीला देखील आळा बसणार असून वनविभागाचे या परिसरावर नियंत्रण असणार आहे.

- राजेश पवार ,वन परिक्षेत्र अधिकारी, त्र्यंबकेश्वर

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com