खबरदारी घेऊनच शाळा उघडणार - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसात
खबरदारी घेऊनच शाळा उघडणार - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात पुन्हा करोनाने ( Corona ) डोके वर काढले असून दैनंदिन रुग्णसंख्या पंधराशेच्या आसपास पोचली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad )यांनी रविवारी 'करोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली असली तरी काळजी घेऊन आणि आरोग्य विभागाच्या ( Health Department )सल्ल्याने शाळा सुरु केल्या जातील', अशी माहिती दिली.

आगामी शैक्षणीक वर्षात राज्य मंडळाच्या शाळा १३ जून तर केंद्रीय मंडळाच्या शाळा ८ जून पासून भरत आहेत. कानपूर आयआयटीने जुलै महिन्यात देशात कराेनाची लाट येणार असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची प्रतीदिन संख्या ९०० च्या पुढे तर राज्यात १४०० च्या पुढे गेली आहे.

आज पनवेल येथे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड काँग्रेसच्या शिबीरात मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या की, 'महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पुन्हा एका चिंतेचा विषय बनली आहे. शाळांसाठी नवी एसओपी (सुनिश्चित कार्यपद्धती) जारी करण्यात येईल. शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसात घेण्यात येईल'.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत प्रश्न आहेत. लसीकरण वाढवण्याबाबत टास्क फोर्सशी सल्ला घेण्यात येईल. तसेच त्यांनी सांगितलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

करोनामुळे शाळा सुमारे दोन वर्ष बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास काही दिवस राहिले आहेत. कोरोना रुग्णसंख्या देशभरात वाढत आहे. राज्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य कोरोना कृती दल यांच्याशी शिक्षण विभाग सल्लामसलत करणार आहे. त्यानंतर खबरदारी घेऊन शाळा उघडल्या जातील, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com