शिष्यवृत्ती घोटाळा : चौकशी चालू आहे...!

शिष्यवृत्ती घोटाळा : चौकशी चालू आहे...!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षणासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीमध्ये सन 2017 मध्ये झालेला 1 हजार 826 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता; मात्र आजही त्याची चौकशी चालूच असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे पैसे खाणार्‍या 64 शैक्षणिक संस्थांची नावे आजही लपवली जात आहेत ? काहींकडून वसूली झाली, तर गुन्हे दाखल का केले नाहीत ? चौकशी अहवालावर निर्णय का होत नाहीत ? असे प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

जर या प्रकरणी कारवाई झाली नाही, तर पुढील कायदेशील लढा हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने दिला जाईल, असा इशाराही परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी दिला आहे.सामाजिक न्याय विभागाला पाठवलेल्या पत्रात इचलकरंजीकर यांनी म्हटले की,वर्ष 2017 मध्ये विधान परिषदेत हा विषय उपस्थित करण्यात आल्यावर तत्कालीन सामाजिक न्यायमंत्र्यांनी घोटाळा झाल्याची कबुली दिली होती.

तसेच 1 हजार 826 कोटींपैकी केवळ 96 कोटी 16 लाख रुपयांची वसुली झाली असून चौकशी चालू असल्याचे म्हटले होते. तसेच यात दोषी असणार्‍या 64 शिक्षण संस्थावर गुन्हे दाखल केले नसल्याचेही मंत्र्यांनी मान्य केले होते. मात्र या संदर्भात पुढे काय झाले, या विषयीची माहिती हिंदु विधीज्ञ परिषदेने माहितीच्या अधिकारात विचारली असता असे सांगण्यात आले की, केंद्र सरकारकडून येणार्‍या शिष्यवृत्तीमध्ये हा घोटाळा झाला असून त्याची चौकशी चालू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com