‘देशदूत-मविप्र’ आयोजित ‘माती वाचवा’ कार्यक्रम; क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी गर्दी

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जगभरात ‘माती वाचवा’ हे मिशन ( Save Soil Campaign ) घेऊन दुचाकीवर प्रवास करणारे श्री. सद्गुरू नाशिकमध्ये पहिल्यांदाच येत आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी तसेच त्यांना पाहण्यासाठीही नाशिककरांमध्ये मोठी उत्सुकता आहे, अवघे शहर हे सद्गुरुमय झाल्याचे दिसून येत आहे. गंगापूररोडवरील केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार्‍या कार्यक्रमासाठी जारी करण्यात आलेला क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी अनेक ठिकाणी नाशिककरांची गर्दी दिसून येत आहे.

अत्यंत आधुनिक पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी येणार्‍या प्रत्येकाला त्यांच्या अ‍ॅण्ड्रॉईड फोनमध्ये असलेल्या क्यूआर स्कॅनर कोडमध्ये जाऊन आयोजकांनी जारी केलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर प्रवेशासाठी आवश्यक असलेला पास त्वरित उपलब्ध होणार आहे. याबाबतचे मार्गदर्शक फलक सर्वत्र लावण्यात आले आहेत. त्याच्यावर बारकोडदेखील लावण्यात आला आहे.

नाशिक हा कृषिप्रधान जिल्हा आहे. नाशिकच्या शेतकर्‍यांचे नवनवीन प्रयोग तसेच आधुनिक शेतीच्या गाथा प्रसिद्ध आहेत. सामान्य नागरिकांसह शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच मातीचे जतन कसे करावे, आगामी काळात मातीत काय काय बदल होऊ शकतात तसेच येणार्‍या पिढीला आपण मातीचा कोणता वारसा सोपवणार आहोत अशा अनेक मुद्यांवर श्री. सद्गुरू जग्गी वासुदेव नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या आगमनाची तयारी मागील तीन महिन्यांपासून सुरू होती. आता त्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी तसेच त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोक आतूर झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *