Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामातीचा ऱ्हास रोखण्यासाठी 'माती वाचवा मोहीम'

मातीचा ऱ्हास रोखण्यासाठी ‘माती वाचवा मोहीम’

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

जगभरात सुपीक मातीचा ( Soil ) होत असलेला ऱ्हास रोखण्यासाठी ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू (Sadguru, the founder of Isha Foundation) यांनी ‘माती वाचवा मोहीम’ ( Save Soil ) हाती घेतली असून या मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबईत ( Mumbai )येत्या १२ जून रोजी एका सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला सद्गुरु उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ईशा फाउंडेशनचे पदाधिकारी एरीज टाटा आणि सुचेता मोंडकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

सध्या जगभरात सुपीक मातीचा ऱ्हास सुरु असून हा ऱ्हास मानवी अस्तित्वासाठी धोकादायक आहे. संयुक्त राष्ट्राने या प्रक्रियेला मातीचा नामशेष होणे म्हणून संबोधले आहे. हा धोका ओळखून भावी पिढीचे नुकसान टाळण्यासाठी आणि मातीचे संवर्धन करण्यासाठी सद्गुरू यांनी २१ मार्चपासून माती वाचवा मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेचा भाग महणून सद्गरु यांनी युरोप, मध्य आशियाआणि अरब देशातून १०० दिवसात ३० हजार किलोमीटर प्रवास मोटारसायकलवरून प्रवास करण्याचा संकल्प सोडला असून आता जवळपास दोन महिन्याच्या प्रवासानंतर सद्गुर उद्या, रविवारी भारतात येत आहेत, अशी माहिती मोंडकर यांनी दिली.

२१ मार्च रोजी सद्गुरूंनी लंडनहून एकट्याने मोटरसायकल प्रवास सुरू केल्यापासून जगातील ७४ राष्ट्रांनी आपापल्या देशातील माती वाचवण्यासाठी ठोस कृती करण्याचे वचन दिले आहे. तसेच कृषी तज्ज्ञ, पर्यावरण संरक्षक, मृदा शास्त्रज्ञ, राजकीय, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय नेत्यांसह अनेक प्रभावशाली व्यक्तींसह लाखो नागरिकांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे, असे टाटा यांनी सांगितले.

सद्गुरू येत्या २९ मे रोजी गुजरातमधील जामनगर मार्गे भारतात प्रवेश करणार आहेत आणि त्यानंतर २५ दिवसांमध्ये ९ राज्यांमधून त्यांचा हा प्रवास पुढे जाईल. जागतिक अन्न आणि पाणी सुरक्षेला ज्यामुळे स्पष्ट धोका निर्माण झाला, अशा जगभरातील सुपीक मातीच्या भयानक ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर, ‘माती वाचवा’ ही जागतिक मोहीम सुरू करण्यात आली आहे. भारतामध्ये, शेतजमिनीत सरासरी सेंद्रिय सामग्री ०.६८% असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे वाळवंटीकरणाचा धोका खूपच जास्त आहे. देशातील जवळपास ३०% सुपीक माती आधीच नापीक झाली असून तिथे कोणतेही पीक येत नाही, अशी माहिती टाटा यांनी दिली.

सध्याच्या मातीच्या ऱ्हासाच्या दरानुसार, २०५० पर्यंत, आतापासून केवळ तीन दशकांच्या आत, पृथ्वीच्या ९०% भागाचे वाळवंटीकरण होऊ शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्र संघटनेने दिला आहे. माती नष्ट झाल्यामुळे जगभरात अभूतपूर्व पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक संकटे येऊ शकतात. त्यामुळे माती वाचवा मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट सर्व राष्ट्रांना तातडीच्या धोरणात्मक सुधारणांद्वारे शेतजमिनीत किमान ३ ते ६% सेंद्रिय सामग्री सक्ती करणे हे आहे. या किमान सेंद्रिय सामग्रीशिवाय, मातीचा मृत्यू जवळच आहे असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जगातील ६०% म्हणजे कमीत कमी साडेतीन अब्ज लोकांचा पाठिंबा या चळवळीला मिळवायचा हा या मोहिमेचा हेतू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या