Save Soil : जमिनीचा कोणता वारसा सोपवणार?

Save Soil : जमिनीचा कोणता वारसा सोपवणार?

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

रासायनिक खतांचा (chemical fertilizers) जास्त भडीमार होत असल्याने जमिनीचा पोत खालावत चालला आहे. पुढच्या पिढीला कशी जमीन आपण हस्तांतरित करणार आहोत याबाबत थोडे चिंतन करण्याची गरज आहे. सेंद्रीय शेतीकडे ( Organic Farming) शेतकर्‍यांनी थोडें वळायला पाहिजे. रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. लागवड होते, त्या प्रमाणात शेतकर्‍याला आर्थिक फायदा होत नाही.

रासायनिक खते, औषधांवर जास्तीत जास्त खर्च होत आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न खालावत चालले आहे. जमिनीचा पोत कसा टिकवता येईल, तिचा गर्भ कसा टिकवता येईल आणि कमी उत्पादन खर्चात चांगले उत्पन्न कसे मिळेल याकडे प्रत्येक शेतकर्‍याने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे जमिनीचा पोत व शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. याबाबत जनजागृती करणे गरजेचे असून त्यादृष्टीने पावले उचलली गेली पाहिजेत.

दीपक जाधव, डुबेरे

मातीची सुपीकता आपणच घालवतो

मातीत कोणते घटक कमी आहेत, ते समजण्यासाठी मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे. कमी असलेले घटक दिल्यास मातीची सुपीकता वाढण्यास मदत होते. वरतून देण्यात येणारी खते ही काहीवेळा घातक ठरू शकतात हे माहीत असतानाही आपण ती देतो आणि मातीची सुपीकता घालवून बसतो. मातीची सुपीकता टिकवण्यासाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय खतांचा वापर वाढवणे गरजेचे आहे. शेणखत, हिरवळीची खते जमिनीत गाडली तर जमिनीचा गर्भ वाढू शकतो. जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचा र्‍हास होत असून जमिनीची उत्पादन क्षमता आपणच कमी केली आहे. त्यामुळे मातीचे परीक्षण करून त्यानुसार आवश्यक ते घटक मातीला दिल्यास उत्पन्न निश्चितच वाढणार आहे.

नवनाथ सैंद्रे, पंचाळे,

बांधावर जास्तीत जास्त वृक्ष लावावेत

माती ही शेतीसाठी उपयुक्त घटक आहे. मातीला शेणखत, कोंबड खते दिली पाहिजे. रासायनिक खतांपेक्षा जैविक खतातून मातीला आवश्यक ते घटक जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. वृक्षतोडीमुळे मातीचे खनन, वहन वाढले असून माती संपुष्टात येऊ लागली आहे. रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे. शेतातील बांध पडीक न ठेवता त्यावर जास्तीत जास्त वृक्ष लावावेत. त्यातून ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल आणि माती टिकेल. त्यातूनच भविष्यात येणार्‍या पिढीला या मातीचा जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो.

अण्णासाहेब पांगारकर, पांगरी

दरवर्षी परीक्षण केले पाहिजे

मातीचे दरवर्षी, प्रत्येक पिकाच्या वेळी परीक्षण केले पाहिजे. मातीमुळेच पिकाला जीवन मिळते. मातीतून आवश्यक ते घटक पिकाला मिळणार आहेत. मातीत कोणते घटक कमी आहेत, हे त्यामुळे समजणार आहे. सेंद्रीय खते अथवा कर्ब, सामू ज्याला आपण सी एन रेश्यो म्हणतो तो पिकाला मॅच झाला पाहिजे. या सर्व बाबी आपल्याला माती परीक्षणातूनच कळणार आहेत.

अमोल दिलीप आनप, वावी

मातीचे परीक्षण दरवर्षी करतो

मी पिकाचे व्यवस्थापन करण्यापूर्वी दरवर्षी मातीचे परीक्षण ( Soil Testing ) करतो. मातीत नेमकी कसली कमतरता आहे, त्यात नेमके काय आहे, ते मला त्यातून समजते. त्यामुळे मातीची सुपीकता टिकवणे मला शक्य होते. पुढच्या पिकांचे गुणोत्तर ठेवून मला त्यानुसार नियोजन करणे सोपे जाते. खते व कीटकनाशक यावर होणारा अनावश्यक खर्च त्यामुळे कमी होतो. गरज नसताना खते, कीटकनाशकांचा वापर केल्याने मातीचे प्रदूषण वाढते. माणसाच्या शरीरात अनावश्यक घटक वाढले तर कॅन्सरसारखे आजार उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे मातीत अनावश्यक घटक वाढल्यास मातीचे आरोग्य धोक्यात येते. माती कसदार होण्याऐवजी नापीक होते. मातीची सुपीकता टिकवण्यासाठी पहिल्या पिकानंतर दुसरे पीक घेण्यापूर्वी मातीला थोडी विश्रांती देणे गरजेचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. आवश्यक तेवढेच पाणी मातीला द्यावे. जास्त पाणी दिल्यास उत्पन्न कमी होते व आर्थिक नुकसान होऊ शकते.

अतुल गोविंद उगले, सोमठाणे, ता. सिन्नर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com