Save Soil : विषमुक्त शेती शक्य आहे !

Save Soil :  विषमुक्त शेती शक्य आहे !

श्यामराव मोगल, प्रगतिशील शेतकरी (Shyamrao Mogal , progressive farmer)

माझ्या पत्नीला अचानक रक्ताच्या कॅन्सरचे (cancer) निदान झाले. खूप प्रयत्नांतीही तिचा जीव वाचवणे शक्य झाले नाही. तिला भयंकर यातना झाल्या. त्यानिमित्त मी विविध रुग्णालयांत जात होतो. तेव्हा सगळीच रुग्णालये ( Hospitals )भरून ओसंडत आहेत हे माझ्या लक्षात आले. तो कालखंड आमच्या कुटुंबियांसाठी फारच भयंकर होता.

या घटनेने माझी विचारधारा बदलली. आपल्या वाडवडिलांना नैसर्गिक मृत्यू आला. तसे आता राहिलेले नाही. असे का, असा प्रश्न मला पडला. आपण जे अन्न खातो तेच दूषित होत आहे, हे माझ्या लक्षात आले. रासायनिक खतांचा भडीमार आणि पाण्याचा अतिवापर नुसता शेतजमिनीलाच नापीक करत नाही तर माणसाचे आरोग्यही खच्ची करतोय, हे माझ्या लक्षात आले. माणसाने जमिनीचे पोट बिघडवले म्हणून माणसाचेही पोट बिघडले. मग मी ही परिस्थिती बदलण्याचे ठरवले आणि 2011 पासून विषमुक्त शेती (Toxin free farming)करण्याचा निर्णय घेतला.

देशी गायी आणि बैल यांच्या सहाय्याने मी माझी शेती फुलवतो. ती विषमुक्त शेतीची संपत्ती आहे. मी गरज वाटली तरच ट्रॅक्टर वापरतो. पाणी देतो. शेतातील पिकाचे अवशेष जाळत नाही. मोठ्या प्रमाणात देशी गायीचे जीवामृत तयार करतो आणि ते वापरतो. त्यामुळे शेतमातीत जिवाणू मोठ्या प्रमाणात वाढतात. ते जमीन सुपीक करण्याचे काम करतात. तणनाशकाचा वापर करूच नये. वास्तविक निसर्गाने सर्वांना जगण्याचा अधिकार दिला आहे. जे कीटक गवतावर यायचे. तणनाशकामुळे हे कीटक पिकावर वरती जातात. त्यामुळे कीटकनाशक वापरावे लागते. त्याची फवारणी केलेला शेतमाल आपण खातो. त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय.

विषमुक्त शेती आधी मनात करायला पाहिजे. तशी तीव्र आंतरिक इच्छा असली पाहिजे. एखाद्या वारकर्‍याला वारीसाठी पंढरपूरला जायचे असते. त्याची तयारी तो दोन महिने आधीपासूनच सुरू करतो. तसेच विषमुक्त शेतीची सुरुवात आधी मनात व्हायला पाहिजे. विषमुक्त शेती करण्यासाठी तुम्ही सगळ्या नैसर्गिक गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. नैसर्गिक शेती करायचा ध्यास घेतला पाहिजे. उदाहरणार्थ तणाचा वैताग नाही झाला पाहिजे. ते तण शेतातच गाडले पाहिजे. ते हिरवळीचे खत. तणनाशकाचा फवारा नको आणि बैलांनी मेहनत घेतली पाहिजे.

विषमुक्त शेती फायद्याची होते, हा माझा अनुभव आहे. करोनाने माणसांना स्वत:च्या आरोग्याचा प्राधान्याने विचार करायला शिकवले. निसर्ग, पाणी आणि देशी गाय यांच्या सहाय्याने तुम्ही विषमुक्त उत्पादन घेऊ शकता आणि बाजारभावसुद्धा मिळवू शकता. हा माझा शंभर टक्के अनुभव आहे. विषमुक्त शेती परवडत नाही, असे सरसकट बोलले जाते. पण मला सांगा, आपले शिक्षण संपल्यानंतर आपण एखाद्या ठिकाणी नोकरीला लागतो तेव्हा लगेच नोकरीत कायम झाल्यासारखा पगार मिळतो का? कंपनी नियमाप्रमाणे तुम्हाला काम करावे लागते. मग तुम्ही कायम होता. तेच तत्त्व विषमुक्त शेतीलाही लागू होते.

विषापासून शेती बाहेर काढायला वेळ तर लागेलच. त्याला साधारणत: तीन वर्षे लागतात. सध्या माती कडक म्हणजे जिवाणू राहिलेले नाही. पिकांचे फेरपालट केले पाहिजे. पाण्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. शेताच्या बांधावर देशी फळझाडे लावली पाहिजेत. त्यावर पक्षी येतील. कीटक आणि आळ्या खातात. शेती किटकमुक्त करतात. हीच दृष्टी आपल्या वाडवडिलांनी अंमलात आणली आणि ते निरोगी आयुष्य आनंदाने जगले. घरात आई, गोठ्यात गाई त्याची शेती सर्वात भारी. याच तत्त्वाने आपण विषमुक्त शेती फायद्याची करू शकतो, हा माझा स्वानुभव आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com