Save Soil : पन्नास वर्षांत मातीला विशेष महत्व

Save Soil : पन्नास वर्षांत मातीला विशेष महत्व

डॉ.योगेश पाटील Dr. Yogesh Patil

पन्नास वर्षांत मातीला विशेष महत्त्व (Special importance to soil) प्राप्त झाले असून पुढेही ते कायम राहणार आहे. वाढती लोकसंख्या, वाढती अन्नधान्याची मागणी यामुळे अधिकाधिक अन्नधान्य पिकवण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळेच मातीला आता विशेष महत्त्व प्राप्त होत चालले आहे. मातीत पोषकद्रव्य असतात ते आपल्याला मिळतात. त्यामुळे मातीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे मत मातीचे महत्त्व या विषयावर बोलताना कुंदेवाडी गहू संशोधन केंद्राचे कनिष्ठ मृद शास्त्रज्ञ डॉ. योगेश पाटील (Junior Soil Scientist of Wheat Research Center. Dr. Yogesh Patil)यांनी व्यक्त केले.

पन्नास वर्षांचा कालावधी पाहता भारतात हरितक्रांती आली. यातून आपण स्वयंपूर्ण झालो. सन 1972 चा दुष्काळ भयंकर होता. त्यावेळी अमेरिकेतून गहू आयात करण्यात आला. मात्र तो निकृष्ट दर्जाचा होता. त्यानंतर भारतात हरितक्रांती घडली. यामध्ये भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. संकरित वाण आले, पाण्याच्या सुविधा निर्माण झाल्या, रासायनिक खतांचा वापरही वाढला.

मात्र जादा उत्पादन घेण्याच्या अतिघाईमुळे मातीकडे दुर्लक्ष झाले. यातच विहिरींची मोठ्या प्रमाणात वाढणारी खोली, खोलवर घेतले जाणारे बोअरवेल, धरणातील सिंचनाच्या पाण्यातून जमिनीवर येणारे क्षार, परिणामी जमिनीची नापीकता वाढत चालली आहे. परिणामी मातीतून अतिरिक्त अन्नद्रव्याची जी गरज निर्माण होत असते, ती कमी होत चालली आहे. परिणामी रासायनिक खतांचा अतिरिक्त भडीमार वाढीस लागला आहे. अशा परिस्थितीत माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. ते करताना जमिनीचे आरोग्यही पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

सिंचनाच्या सुविधा वाढल्याने आता वर्षभर पिके घेतली जात आहेत. परिणामी रासायनिक खतांचा तसेच कीटकनाशकांचा भडीमार होत आहे. जमिनीचा सेंद्रीय कर्ब यामुळे कमी झाला आहे. येणार्‍या काळात तर अन्नधान्यातून आरोग्य बिघडवण्याचे प्रकार अजूनच वाढणार आहेत. त्यामुळे वेळीच माती परीक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मातीतून पिकणारे अन्नधान्य हे खाण्यायोग्य आहे की नाही? हे आता जगभर पाहिले जात आहे. रेसिड्यू फ्री अर्थात विषमुक्त शेती उत्पादन जगाच्या पाठीवर प्रत्येकालाच हवे आहे. यासाठी जगभराच्या मानांकनात बसण्यासाठी व त्या स्पर्धेत टिकण्यासाठी आपणही तसे शेती उत्पादन घेणे गरजेचे झाले आहे.

याकरता सेंद्रीय शेती करण्याकडे कल वाढत आहे. अशा शेतीसाठी आवश्यक बैलजोडी अनेक शेतकर्‍यांकडे नाही. ज्या शेतकर्‍यांकडे गाई आहेत त्या केवळ घरचे दूध भागवण्यापुरत्याच आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेतीला जे आवश्यक शेणखत, गोमूत्र लागते तसेच सडलेला, कुजलेला चारा, वैरण लागते ते उपलब्ध होत नाही. याला दुसरा पर्याय म्हणजे शेतात पिकांचे पडलेले अवशेष होय. मात्र शेतकरी पीक निघाल्यानंतर शेतात राहणारे हे अवशेष जाळून टाकतात. ते जाळू नये. जमिनीचा कस जपण्यासाठी एकात्मिक कीड व रोग नियंत्रण, अन्नद्रव्य व्यवस्थापन या तीन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे.

यातून शेतातील उत्पादनात वाढ होते. तसेच जमिनीची सुपीकता वाढण्यासदेखील मदत होते. कीड रोगांचे नियंत्रण वेळीच केले तर रासायनिक घटकांचा वापर करण्याचीही गरज राहत नाही. शिवाय यातून विषमुक्त शेती उत्पादनदेखील निघते. वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य आपल्याला त्यासाठी उपलब्ध जमिनीतूनच घ्यावे लागणार हे निश्चित. त्यामुळे जमीन नापीक होऊ नये, हे वेळीच पाहणे काळाची गरज आहे. यासाठीच सेंद्रीय शेतीचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. याबरोबरच पावसाने जमिनीची जी धूप होते ती थांबवण्यासाठी शेतामध्ये बांध घालणे, मशागतीच्या योग्य पद्धतींचा अवलंब करावा लागेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com