Save Soil : देशदूत-मविप्र आयोजित श्री सद्गुरूंच्या कार्यक्रमातील विशेष फोटो पाहा 'इथे'

Save Soil : देशदूत-मविप्र आयोजित श्री सद्गुरूंच्या कार्यक्रमातील विशेष फोटो पाहा 'इथे'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दैनिक ‘देशदूत’(Deshdooy) आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्था (Maratha Vidyaprasarak Sanstha) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. सद्गुरू (Sadhguru) अर्थात जग्गी वासुदेव (Jaggi Vasudev) यांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा भव्यदिव्य कार्यक्रम केटीएचएम महाविद्यालयाच्या विशाल मैदानावर (KTHM College Ground) आयोजित करण्यात आला. यावेळी सद्गुरूंनी नाशिककरांशी संवाद साधला....

कार्यक्रमास नाशिककरांचा उदंड प्रतिसाद लाभला. सदगुरूंवर प्रेम करणारे चाहते आणि श्रोत्यांनी मैदान खच्चून भरले होते. ‘माती वाचवा’ (Save Soil) कार्यक्रमाचे प्रायोजक दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, अ‍ॅग्रि सर्च (इंडिया) प्रा. लि., चंंदुकाका सराफ अ‍ॅण्ड सन्स प्रा.लि., इंंडियन ऑईल, डेअरी पॉवर लि., धुमाळ इंडस्ट्रीज तर रेडिओ विश्वास रेडिओ पार्टनर होते.

‘देशदूत’चे व्यवस्थापकीय संचालक जनक सारडा यांनी येवल्याच्या पैठणीतून तयार झालेली पुणेरी पगडी घालून सद्गुरूंचा सत्कार केला. मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी शेला देऊन सद्गुरूंचा सत्कार केला. ‘देशदूत’चे अध्यक्ष विक्रम सारडा यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी पंचतत्त्वाच्या प्रतिकात्मक भेटवस्तू देऊन स्वागत केले. प्रास्ताविक जनक सारडा यांनी केले.

यावेळी सद्गुरू म्हणाले की, माती हा आपला वारसा आहे, ती जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. ‘माती वाचवा’ अभियानाचा मूळ उद्देश माती नष्ट होणे टाळणे हा आहे. माती वाचवण्यासाठी जगातील सर्व देशांनी धोरण आखण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य धोरणे बनवण्याची गरज आहे. लोकांना मातीचे महत्त्व कळत नाही. 74 राष्ट्रांनी ‘माती वाचवा’ अभियानाला प्रतिसाद देत या अभियानासाठी स्वाक्षरी केली आहे.

जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे जतन करणे आवश्यक आहे. माती ही आपली संपत्ती नसून तो आपल्या पिढीचा वारसा आहे. हा वारसा येणार्‍या पिढीला देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. माती वाचवण्यासाठी पूर्वपार रुजलेली लोकचळवळ पुन्हा गतिमान करावी लागेल. विविध प्रकारच्या मातीची परिस्थिती, सांस्कृतिक आणि आर्थिक परंंपरांंच्या भिन्न संदर्भाचा विचार करून जमिनीच्या र्‍हासाची समस्या कशी हाताळायची यावर बारकावे शोधावे लागतील.

आपल्याला सुपीक जमीन वाचवण्यासाठी आकर्षक प्रोत्साहन देऊन 3 ते 6 टक्के सेंद्रिय सामग्रीचा थर टिकवणे आवश्यक आहे. त्याकरता शेतकर्‍यांना महत्त्वाकांक्षी बनवावे लागेल. प्रोत्साहनांतून स्पर्धा निर्माण होईल. अनेक वर्षे त्यांची अंमलबजावणी करावी लागेल. टप्प्याटप्प्याने कार्यक्रम राबवावा लागेल. पहिला टप्पा प्रेरणा देण्याचा, दुसरा प्रोत्साहन आणि शेवटी काही योग्यतेसह त्याचे फायदे दाखवून देणारा तिसरा टप्पा असावा, असे सद्गुरूंनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com