Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याSave Soil : मेरी अपनी मिट्टी!

Save Soil : मेरी अपनी मिट्टी!

डॉ. अर्चना तोंडे, आयुर्वेदाचार्य (Dr. Archana Tonde, Ayurvedacharya)

खूप पूर्वी मी एक संकल्पना ऐकली ‘अपना अपना आकाश, आपली स्पेस’ या अर्थाने ते खूपदा नंतर वाचनात आले. त्याच धर्तीवर मातीविषयी ( Soil )विचार करताना वाटतेय. आयुर्वेदिक साहित्यात एक छान विचार आहे. प्रत्येक जीव जिथे जन्माला येतो त्याला लागणार्‍या सार्‍या औषधांची उपज ही त्याच्या आजूबाजूच्या मातीतच होत असते. म्हणजे असे की, त्या-त्या भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने जी जीवनशैली तो जगतोय त्यानुसार ज्या व्याधी त्याला होण्याची शक्यता आहे, त्याच्या चिकित्सेसाठी लागणारी किंवा स्वस्थ राहण्यासाठी त्याला जी औषधे लागतील ती त्याच्या आजूबाजूच्याच परिसरात असतील, सापडतील. म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या आरोग्यविषयक, पोषणविषयक गरजा भागवण्याची क्षमता त्या मातीतच असते. म्हणून विचार येतो ‘मेरी वाली मिट्टी’.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर जेव्हा मी ऐकते की अमूक अमूक परदेशी पदार्थ जसे फळे, भाज्या, फुले ही प्रयत्नांनी आपल्या इथेही पिकवता येतात किंवा पिकवली जातात तेव्हा प्रश्न पडतो त्याची खरच गरज आहे का? इतका सगळा खटाटोप कशासाठी? निसर्गाने ( Nature )स्वतःचे काही पायंडे ठरवलेत ते निसर्गाच्या हितासाठीच पर्यायाने आपल्या हितासाठीच. म्हणजे आपल्या मातीतील नसलेल्या पिकाची खरेतर आपल्याला गरजच नाही आणि केवळ नवीन्याच्या हव्यासापायी कितीतरी श्रम वाया जातात, संसाधने वापरली जातात व उत्पन्न होणार्‍या गोष्टींची जेव्हा की काही गरजच नसते.

एका याच विषयावरच्या पुस्तकात फारच विदारक असे शास्त्रीय सत्य वाचनात आले, जेव्हा एखादे अगदी अनोळखी पीक एखाद्या जमिनीत घेतले जात तेव्हा तिथल्या निसर्गासाठी ते परके असते, आगंतूक असते अशावेळी निसर्गाची स्वसंरक्षण संस्था कामाला लागते. ते रोप, झाड, पीक जगू नये म्हणून निसर्ग हरतर्‍हेचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्नातूनच मग अशा रोपावर, झाडावर, पिकांवर पटकन कीड लागते व त्यासाठी त्यावर खूप सारी कीटकनाशके फवारावी लागतात. ही कीटकनाशके भाज्यांच्या माध्यमातून आपल्या पोटात जातात. आपल्या जमिनीचे कायमस्वरुपी अतोनात नुकसान होते. जमीनच प्रदूषित झाली तर आपण जायचे कुठे?

आयुर्वेद चिकित्सा करताना काही औषध उपटून काढावी लागतात, उदा. नागरमोथा, तर ते उपटत असताना त्याला बरीच माती लागून येते. ती तशीच आपण घरी घेऊन येतो. ती तिथेच व्यवस्थित झटकली पाहिजे, म्हणजे घरी गेल्यावर ती कचर्‍यात जाणार नाही. जेव्हा हे सगळे मुद्दे आपण एकत्रित करतो तेव्हा तयार होणारा एक व्यापक असा सर्वसामावेशक विचार समोर येतो की माती ही आपल्या जगण्यासाठी प्राणवायूइतकीच आवश्यक गोष्ट आहे. माती बनण्यासाठी निसर्गाला हजारो वर्षे लागतात. अशी माती सवर्धित करणे, जपणे हे आपले आद्य कर्तव्य आहे (Save soil is our first duty).

विशेषतः ही माती वाहून जाऊ नये, उगाच वापरून संपू नये तसेच आपल्या हव्यासापोटी ती कीटकनाशकांनी दूषित, आजारी होऊ नये. परंतु हे सगळे टाळायचे कसे, हा मोठा प्रश्न आहे. पण यावर खूप सुंदर विचार महात्मा गांधी आपल्याला देतात. ते म्हणतात, निसर्ग तुमच्या गरजेपुरते नक्की देतो. परंतु तुमच्या हव्यासाला तो पुरा पडू शकत नाही. पण आपण गरज आणि हव्यास यातला फरकच आता विसरून गेलोय. हव्यासानेच गरजेचे रूप घेतलेय. त्याला ओळखण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण प्रत्येकामध्ये तो त्याच्यापुरता दडून बसलाय.

ज्याला त्याला स्वतःतील बहुरूपीया स्वतःच ओढून बाहेर काढावा लागेल. नाहीतर पायाखालची जमीन राहणार नाही. हा सगळाच जगण्याचा डोलारा अनेक पिढ्या आधीच कोसळून नष्ट होईल. आपल्यापुरते आपल्या मातीतच उगवते एवढा विचार जरी मध्यवर्ती ठेवून आपली प्रत्येक कृती केली तरीही ते एक पाऊल असेल, आपली आपली माती वाचवण्याचे. हे पाऊल आपण उचललेच नाहीतर जमीन माऊली कितीही दयाळू असली तरी आपल्यासाठी ती काहीच करू शकणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या