Save Soil : चार हंगामात शेती करावी

Save Soil : चार हंगामात शेती करावी

माधराव बर्वे

रासायनिक खतांच्या (chemical fertilizers) अतिवापराने शेतीतील उत्पादन क्षमता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. यासाठी पीक पद्धतीमध्ये बदल करून खरीप, रब्बी, उन्हाळी आणि बारमाही अशा चार प्रकारात शेती करावी. याबरोबरच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी चिंच, औदुंबर, पिंपळ, कडुनिंब अशी झाडे लावावी, असा सल्ला नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते माधराव बर्वे यांनी दिला आहे. नैसर्गिक शेती कशी असावी, ती कशी करावी, नैसर्गिक शेती पद्धत (Natural farming method)कशी योग्य कशी अयोग्य या विषयावर त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

शेतजमिनीवरील कूज वाळून जाणे, क्षारयुक्त जमीन तयार होणे. यामुळे मातीचा र्‍हास होत चालला आहे. शेतकर्‍यांनी आपल्या शेतात दरवर्षी नांगरट करू नये. कारण अशा नांगरटीमुळे माती वर-खाली होते. खालची माती वर आल्यामुळे खत खाली जाऊन नुकसानच होते. यासाठी हलकी वरच्यावर मशागत करणे गरजेचे आहे. जादा रासायनिक खतांच्या वापराने जमिनीतील पीएच वाढत चालला आहे.

परिणामी पिकांची उत्पादन क्षमता कमी होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे. यासाठी रासायनिक खतांचा कमी वापर करणे बंदच करणे आवश्यक आहे. पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. जमिनीत जादा पाण्याच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात क्षार वाढतात. यासाठी वर्षभरात जे पीक घेतो त्या हंगामाचे चार भाग करावेत. या चार हंगामांमध्ये म्हणजेच खरीप, रब्बी, उन्हाळी आणि बारमाही अशा पद्धतीने शेती करावी.

एका हंगामात काही न करता तसेच ठेवावे. जमिनीची नांगरट ही लाकडी नांगराने करणे गरजेचे आहे. या चार हंगामामध्ये दरवर्षी पीक बदल करणे आवश्यक आहे. शेतामध्ये एकदल व द्विदल पिके घ्यावी. एकदल वर एकदल पीक चालत नाही, जे द्विदल वर्गीय पिकात चालते. पीक बदल केल्याने उत्पादन क्षमता वाढण्यास मदतच होते. आपल्या शेतजमिनीमध्ये बांधबंदिस्ती प्रामुख्याने करावी, जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाणार नाही. अतिपाण्याने व क्षार वाढल्याने जमिनीची पोत बिघडते. त्यामुळे याचे नियोजन व्यवस्थित होणे गरजेचे आहे. पूर्वीच्या पद्धतीने शेती करावी. हे अनुभवा रासायनिक खतांच्या अतिवापराने अंतीच ठरवण्यात आलेले आहे. मक्याचे पीक दरवर्षी घेऊ नये तर ते चार वर्षांनी एकदा घेतले तरी चालते.

सूर्यफुलाचे पीक घेतले तर जमिनीमधील चिकटपणा कमी होण्यास निश्चितच मदत होते. म्हणून ही पिके अधून-मधून घेणे गरजेचे आहे. ऊस आणि त्यानंतर गहू अशा पीक पद्धतीमुळे उत्पादनात घट आली आहे. पूर्वी 80 टनापर्यंत एकरी उत्पादन होते ते आता 25 टनांवर आले आहे. याचे कारण म्हणजे शेतजमिनीत वाढलेले क्षारांचे प्रमाण. बारमाही पाण्यामुळेही जमिनीत क्षार वाढत आहेत. यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे. मी माझे गाव म्हणजे कोठुरे (ता. निफाड) येथे ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक हजार चिंचांची झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे.

अधिकाधिक झाडे लावून पर्यावरण संतुलन राहावे, यासाठी प्रयत्नशील आहे. चिंचेचे झाड 500 वर्षे जगते व फळेही देते. या झाडाला पाणी कमी लागते. ते रोगालाही बळी पडत नाही. शंभर चिंचेच्या झाडांपासून वर्षाकाठी अडीच लाख रुपये उत्पन्न मिळते. ही झाडे लावल्यामुळे कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. माणसालाही या झाडांपासून आरोग्य मिळते. चिंचेबरोबरच औदुंबर, कडुनिंब, पिंपळ अशी झाडे लावल्यास पाळीव जनावरांचेही स्वास्थ्य चांगले राहते. असे केले तरच पुढच्या पिढीला आपण एक चांगली कसदार जमीन देऊ शकू. ही आपली जबाबदारी आहे. आपल्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे आपल्याला कसदार जमीन दिली, तशीच आपण पुढच्या पिढीला देणे ही आपली जबाबदारी आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com