भगूरमध्ये सावरकर थीमपार्क, आंतरराष्ट्रीय संग्रहालय : लोढा

आत्मार्पणदिनी स्वा.सावरकरांना मानवंदना
भगूरमध्ये सावरकर थीमपार्क, आंतरराष्ट्रीय संग्रहालय : लोढा

भगूर/नाशिक । वार्ताहर/प्रतिनिधी Bhagur

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक व प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूर (जि. नाशिक) येथे स्वा. सावरकरांचे जीवनकार्य मांडणारे भव्य सावरकर थीमपार्क व आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त पर्यटन विभागामार्फत भगूर येथे आयोजित पदयात्रा व अभिवादन कार्यक्रमाला पर्यटनमंत्री लोढा उपस्थित होते. व्यासपीठावर पर्यटनमंत्री लोढा, विवेक व्यासपीठच्या अश्विनी मयेकर, विश्वहिंदू परीषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष एकनाथराव शेटे, खा. हेमंत गोडसे, आ. राहुल ढिकले आदीसह सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संबोधित करताना पर्यटनमंत्री लोढा म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार व जीवनकार्य सर्व भारतीयांसाठी एक प्रेरणा आहे. त्यांचे जीवनकार्य व विचार भारतातच नव्हे तर जगभर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून सावरकरांचे जन्मस्थान भगूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय व भव्य थीम पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. भगूरचे अपूर्णावस्थेतील थीम पार्क महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आपल्याकडे हस्तांतरित करून घेत आहे. त्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होत आहे, असेही लोढा यांनी सांगितले.

स्वा. सावरकरांचे जीवनकार्य जगभर पोहोचवण्याच्या प्रयत्नांअंतर्गत पर्यटन विभागामार्फत महाराष्ट्रात वीर सावरकर पर्यटन सकिर्र्टची निर्मिती करण्याची घोषणाही लोढा यांनी केली. स्वा. सावरकरांचे वास्तव्य लाभलेली राज्यातील अनेक ठिकाणे आहेत. भगूरमधील त्यांच्या जन्मस्थानासह नाशिकचे अभिनव भारत मंदिर, पुण्याचे सावरकर अध्यासन केंद्र, फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृह, सांगलीतील बाबाराव सावरकर यांचे स्मारक, रत्नागिरीचे सामाजिक समरसतेचे प्रतीक अर्थात पतितपावन मंदिर व मुंबईचे सावरकर सदन, सावरकर स्मारक या ठिकाणी पर्यटन शृंखला तयार केली जाणार आहे.

यातील प्रत्येक स्थानाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून कसे विकसित करता येईल व जगभरातून अधिकाधिक पर्यटक येथे कसे भेट देतील, यासाठी पर्यटन विभाग विविध प्रकल्प राबवणार आहे, असे लोढा म्हणाले.

हजारो नागरिकांचे अभिवादन

स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त पर्यटन विभाग व सहयोगी अनेक संस्था-संघटनांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या पदयात्रा व अभिवादन कार्यक्रमास हजारो भगूर-नाशिकवासी सावरकरभक्त नागरिक उपस्थित होते. भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी अभिवादन पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत सावरकरांच्या जीवनात महत्वाचे स्थान असलेल्या ऐतिहासिक अष्टभुजा देवीची पालखीही सहभागी झाली.

सावरकर लिखित गीतांचे गायन

सावरकर वाडा येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक चारुदत्त दीक्षित व सहकलाकारांचे स्वा. सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित ङ्गसावरकर आणि मृत्यूफ या संवादाचे बद्रीश कट्टी व आदित्य धलवार यांचे अभिवाचन आदी कार्यक्रम झाले. यावेळी अनेक मान्यवर व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन संजय केकाणे यांनी केले. कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com