
मुंबई | Mumbai
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील कोकणवासीयांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण (Satyajit Chavhan) यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी आज ट्विट करीत ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हेदेखील उपस्थित होते...
बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजीत चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भेट घेतली.
दरम्यान, रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायम असून तेथील पाच गावांतील ग्रामपंचायतीने घेतलेल्या ग्रामसभेचे ठराव या प्रकल्पाविरोधात आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या माती परीक्षणाला विरोध करण्यासाठी चार हजारांहून अधिक ग्रामस्थ बारसू सोलगावच्या सड्यावर उपस्थित आहेत. हे ग्रामस्थ बाहेरून आलेले नसून आजूबाजूच्या गावातील स्थानिक आहेत.
एकीकडे आंदोलक मातीपरीक्षण थांबवून चर्चेसाठी तयार आहेत. तर दुसरीकडे सरकार माती परिक्षण सुरु ठेवून चर्चा करु म्हणत आहे. उद्योगमंत्री म्हणतात, माती परिक्षण होणार आहे. पाच ग्रामपंचायतींमध्ये प्रकल्प आणण्याचा प्रयत्न आहे, पण या ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं नाही. समर्थन आहे, असं पसरवलंय, पण तसं काही नाही.
दरम्यान, बारसू प्रकल्पाचे सुरू असलेले सर्वेक्षण थांबवून, पोलिसांचा फौजफाटा मागे घेऊन दडपशाही थांबवली तरच राज्य सरकारसोबत चर्चा करू, असा इशारा प्रकल्पविरोधी लढ्याचे नेते सत्यजित चव्हाण यांनी दिला. तसेच आमच्या विकासाचे मॉडेल आमच्याच म्हणण्यानुसार चर्चेत मांडले जाईल, अशीही भूमिका चव्हाण यांनी शुक्रवारी (२८ एप्रिल) मुंबईतील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मांडली होती.
दरम्यान, आज शरद पवार यांची आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांनी भेट घेतली. यावेळी बारसू येथे होत असलेली रिफायनरी, आंदोलकांची भूमिका यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.