मला उमेदवारी मिळू नये यासाठी मोठे षडयंत्र; सत्यजित तांबेंचा रोख नेमका कुणाकडे?

मला उमेदवारी मिळू नये यासाठी मोठे षडयंत्र;  सत्यजित तांबेंचा रोख नेमका कुणाकडे?

नाशिक | Nashik

नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये (Nashik Graduate Election) अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा मोठ्या मताने दणदणीत विजय झाला आहे. या विजयानंतर लवकरच मी राजकीय भूमिका स्पष्ट करेन अशी प्रतिक्रिया सत्यजित तांबे यांनी दिली होती. त्यानंतर आज तांबे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली...

यावेळी ते म्हणाले की, मी विद्यार्थी चळवळीतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेक कामे केली. त्यावेळी माझ्यावर ५० केसेस लावण्यात आल्या, तरीही मी काँग्रेससाठी काम केले, पण वडील आमदार आहेत हे कारण सांगत मला नेहमी डावलण्यात आल्याची खंत नवनियुक्त आमदार सत्यजित तांबे (MLA Satyajeet Tambe) यांनी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले की, नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नसून चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे कॉंग्रेसच्या प्रदेश पातळीवर निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की, मला संधी मिळू नये, युवकांना संधी मिळू नये म्हणून वरच्या स्तरावर प्रयत्न करण्यात आले. माझ्या वडिलांना शो कॉज नोटीस न देता एक मिनिटात निलंबित करण्यात आले असे त्यांनी सांगितले. तसेच मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचे काम काही नेत्यांकडून केलं जात आहे असा आरोपही सत्यजित तांबे यांनी केला. 

पुढे ते म्हणाले की, युवक काँग्रेसचं पद गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला कुठेतरी संधी देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं जातं. त्याला विधान परिषदेवर घेतात. यासाठी ज्यावेळी मी माझ्या पक्षश्रेष्ठींकडे जायचो, तेव्हा तुमच्या घरात तुमचे वडील आमदार आहेत.त्यामुळे तुम्हाला विधान परिषद देता येणार नाही, असं सांगितलं जायचं. वास्तविक माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने नाशिक मतदारसंघ वाढवला आहे. २००९ पासून माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने हा मतदारसंघ उभा केला आहे. पण जेव्हा मी आमचे पक्षश्रेष्ठी एच के पाटील यांना भेटून मला संधी द्या, सांगितलं.

तसेच मी संघटनेत एखादं पद किंवा जबाबदारी मागितली होती. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. तुम्ही तुमच्या वडिलांच्या जागेवर विधान परिषदेची निवडणूक लढा असं सांगण्यात आलं, असं जेव्हा एच के पाटील बोलले तेव्हा मला प्रचंड संताप आला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, माझ्या वडिलांच्या जागेवर जर मला निवडणूक लढवायची असती, तर मी २२ वर्षे संघटनेसाठी जे काम केलं, हा विचार वाढवण्याचं काम केलं. मला पक्षाने किंवा संघटनेनं काहीतरी द्यावं, अशी मानसिकता आहे, वडिलांच्या जागी निवडणूक लढवावी, अशी माझी मानसिकता नाही, हे मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं, पण दुसरी कुठली संधी तुला देणं शक्य नाही, तू वडिलांच्या जागी प्रयत्न कर, असा सल्ला ते मला देऊ लागले, याला माझा पूर्णपणे विरोध होता, असे सत्यजित तांबे म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com