काँग्रेसचे उद्या सत्याग्रह आंदोलन

सोनिया गांधींच्या चौकशीचा निषेध
काँग्रेसचे उद्या सत्याग्रह आंदोलन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Congress president Sonia Gandhi ) यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) सुरू असलेल्या चौकशी विरोधात सातत्याने आंदोलन काँग्रेसने उद्या, मंगळवारी राज्यभरात शांततापूर्ण सत्याग्रहाचे आयोजन केले आहे. या दिवशीमुंबईत मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर सकाळी १० वाजल्यापासून सत्याग्रह करण्यात येणार आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधकांना संपवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. मोदी सरकारच्या या दहपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. सोनिया गांधी आजारी असून वयाच्या ७० व्या वर्षी त्यांना चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात आहे. मोदी सरकारच्या या हुकूमशाही विरोधात काँग्रेस पक्ष २६ जुलैला पुन्हा एकदा शांततापूर्ण सत्याग्रह करून या कारवाईचा विरोध करेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole)यांनी सांगितले.

जोपर्यंत सोनिया गांधी यांना ईडी कार्यालयातून मुक्त केले जात नाही तोपर्यंत सत्याग्रह सुरुच राहणार आहे. २१ तारखेला सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. आता पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. राहुल गांधी यांचीही पाच दिवस दररोज १०-१० तास ईडीने चौकशी केली. या चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही आणि होणार नाही. ईडीचे अधिकारी केंद्रातील त्यांच्या ‘बॉस’च्या इशाऱ्यावर नाचत आहेत. चौकशीच्या नावाखाली विरोधकांना त्रास देण्याचे भाजपचे राजकारण फारकाळ टिकणार नाही, अशी टीका पटोले यांनी केली.

काँग्रेस पक्षाने सूडाचे राजकारण कधीच केले नाही. पण केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपने लोकशाही आणि संविधान धाब्यावर बसवून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देत आहे. काँग्रेस पक्ष अशा कोणत्याही दडपशाहीला घाबरत नाही. काँग्रेस पक्ष सोनिया गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. हुकुमशाही सरकारला जनताच त्यांची जागा दाखवेल असेही पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com