सरपंच,ग्रामसेविका आणि माजी सरपंच 'एसीबी'च्या जाळ्यात

५० हजारांची लाच भोवली
सरपंच,ग्रामसेविका आणि माजी सरपंच 'एसीबी'च्या जाळ्यात

इगतपुरी । वाल्मीक गवांदे Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील( Igatpuri) बलायदुरी(Balayduri ) येथील सरपंच, ग्रामसेविका व माजी सरपंचाला लाच घेतल्याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार दि. ७ रोजी दुपारी रंगेहाथ पकडले.

शिपाई म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून देय असणारी १ लाख ६४ हजार ६८२ एवढी रक्कम देण्याच्या बदल्यात ५० हजाराची लाच घेतली म्हणून ही कारवाई करण्यात आली.

सरपंच हिरामण पांडुरंग दुभाषे, वय २५, ग्रामसेविका आशा देवराम गोडसे, वय ३७, माजी सरपंच मल्हारी पंढरीनाथ गटखळ, वय ५६ यांना या प्रकरणी रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना टाके घोटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात घडली असुन सेवानिवृत्तीचे १ लाख ६४ हजार ६८२ रुपये देण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडून ५० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात ६० वर्षीय तक्रारदाराने थेट नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी टाकेघोटी येथे सापळा रचला. दरम्यान ठरल्या प्रमाणे मंगळवारी दुपारी टाकेघोटी येथे ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी लाच स्विकारताच आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री ऊशिरा पर्यंत सुरु होती.

सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षकासह सापळा अधिकारी पोलीस उप अधीक्षक वैशाली पाटील, सापळा पथक एकनाथ बाविस्कर, राजेंद्र जाधव, शरद हेंबाडे, नितीन नेटारे, संतोष गांगुर्डे यांनी ही यशस्वी कारवाई केली. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com