
मुंबई | Mumbai
करोना काळात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे यांना अटक केली आहे. डॉ. बिसुरे हे दहिसरच्या करोना फिल्ड रुग्णालयाचे प्रमुख होते. याच रुग्णालयाला संजीव जयस्वाल यांनी मंजुरी दिली होती. त्यात सुजित पाटकर यांनी मध्यस्थी केल्याचा ईडीला संशय आहे...
जून महिन्यात ईडीने एकाच वेळी तब्बल १६ ठिकाणी छापे टाकले होते. तेव्हा सुजित पाटकर यांच्याही घरी ईडीचे पथक धडकले होते. लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक म्हणून सुजित पाटकर हे काम पाहात होते. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले होते.
करोना काळात रुग्णालय उभारणीत घोटाळा केल्याचा ईडीला संशय आहे. ईडीने मागील महिन्यात छापा टाकलेल्या ठिकाणांमध्ये सांताक्रुझ, मालाड, परळ, वरळी येथील ठिकाणांचा समावेश होता. २४ ऑगस्ट २०२२ च्या एफआयआरच्या आधारे ईडीकडून छापे टाकण्यात आले. पाटकर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आणखी एक पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्याशी संबंधित ठिकाणीही ईडीने छापे टाकले होते.
दरम्यान, भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करोना काळात दिलेल्या वेगवेगळ्या कंत्राटांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. सुजित पाटकर यांनी मुंबईतील वेगवेगळ्या जम्बो करोना केंद्रात जून २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी काढलेल्या निविदा मिळवण्यासाठी 'लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेस' ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी आधी अस्तित्वात नसून केवळ कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे तयार करण्यात आली आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.