
मुंबई | Mumbai
जळगावातील जिल्ह्यातील (Jalgaon District) पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, या सभेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत...
त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर करोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आगामी १५ दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) कोसळणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
यावेळी राऊत म्हणाले की, माझ्याकडे गुलाबराव पाटील यांनी करोना काळात केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. करोना काळात पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चढ्या भावात वस्तूंची खरेदी केली होती. यामध्ये ऑक्सिजन व्हेंटीलेटर्सचाही समावेश होता. त्यावेळी दोन लाखांचे व्हेंटीलेटर १५ लाखांना खरेदी केले गेले. महत्त्वाचे म्हणजे या भ्रष्टाचारावर त्याच गॅंगचे सदस्य चिमणराव पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केले होते. हा घोटाळा (Scam) साधारण ४०० कोटी रुपयांचा आहे. मात्र, हे प्रकरण दाबले जात आहे, असे त्यांनी म्हटले.
पुढे राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याच्या वक्तव्यावर बोलताना म्हटले की, प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहे. आम्ही मात्र निकालाची वाट पाहत आहोत. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या ४० लोकांचे जे काही राज्य आहे, ते पुढील १५ ते २० दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले. तसेच मी मागे देखील एकदा म्हटले होते की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही, या सरकारचा 'डेथ वॉरंट' निघालेले आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे ठरले असल्याचे संजय राऊतांनी म्हटले.