
मुंबई | Mumbai
सध्या राज्यभरात गाजत असलेल्या अंमली पदार्थांप्रकरणी मुंबई साकीनाका पोलिसांनी (Mumbai Sakinaka Police) काल (बुधवारी) ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) तामिळनाडू (Tamil Nadu) येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला मुंबईत (Mumbai) आणल्यावर पोलीस मेडिकल चेकअपसाठी घेऊन जात असताना ललित पाटीलने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये "मी पळालो नाही तर मला पळवलं गेलं यात कुणाकुणाचा सहभाग आहे हे लवकरच सांगेन" असे म्हणत मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे...
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, "मुंबई आणि पुण्यात आतापर्यंत ७०० ते ८०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त झाले आहे. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावं. ललित पाटील हा केवळ एक मोहरा आहे. या ललित पाटील प्रकरणाचा गैरवापर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणासाठी करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे", असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. तसेच "पोलिसांच्या ताब्यात असणारा ड्रग्जमाफिया (Drug Mafia) सांगतो की मला पळवून नेण्यात आलं. येरवड्यातून त्याला बाहेर काढलं, ससून रुग्णालयात ०९ महिने त्याला ठेवण्यात आलं. सरकारी पाहुण्यासारखं त्याची खातिरदारी करण्यात आली. मंत्र्यांच्या आदेशाने त्याला पळवून नेण्यात आलं. त्याची व्यवस्था करण्यात आली. हे तो माफिया स्वत: सांगत आहे. त्यामुळे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं डोकं ठिकाणावर आहे का? की त्यांनाही नैराश्याने ग्रासले आहे", असा सवाल देखील संजय राऊत यांनी यावेळी विचारला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, "आतापर्यंत दीड लाख कोटींचे ड्रग्ज हे गुजरातमध्ये पकडले गेले आणि जे पकडले गेले नाही ते ड्रग्ज महाराष्ट्रात (Maharashtra) पाठवले जात असून महाराष्ट्राचा 'उडता पंजाब' करून महाराष्ट्र नशेच्या आहारी टाकला जात आहे. महाराष्ट्र बदनाम करायचा, महाराष्ट्राची तरुण पिढी उद्ध्वस्त कराची. हे जर देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल, तर त्यांनी खुशाल या विषयाचं राजकारण करत बसावं आणि महाराष्ट्राला खड्ड्यात जाताना पाहावं", असेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले. तसेच "देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असून त्यांनी गृहमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला जपावे आणि तसे वागावे, अशी विनंती देखील राऊत यांनी केली. याशिवाय उद्या ड्रग्ज विरोधात नाशिकमध्ये मोर्चा आहे. यात कॉलेजचे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि नाशिकचे नागरिक सहभागी होतील. कारण नाशिकपासून ते त्र्यंबकेश्वरपर्यंतचा (Nashik to Trimbakeshwar) संपूर्ण परिसर ड्रग्जच्या विळख्यात सापडला आहे", असेही राऊत म्हणाले.
तसेच "ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे नाशिक कनेक्शन आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) या संदर्भात दोन कॅबिनेट मंत्र्यांवर आरोप केले आहेत. हे दोन मंत्री या सगळ्या प्रकरणात आहेत. फडणवीसांनी त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर बोलावं. चौकशी आयोग नेमावा आणि हिंमत असेल तर दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत", असा घणाघात देखील राऊत यांनी यावेळी फडणवीस यांच्यावर केला. तसेच "आम्हाला धमक्या देऊ नका. फार तर काय कराल, तुम्ही आमच्यावर खोटी प्रकरणं आणि खोटे गुन्हे दाखल कराल. २०२४ मध्ये काय होणार ते लक्षात ठेवा. २०२४ ला तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. आतापर्यंत आम्ही कधी सूडाने वागलो नाही. राजकारण हे सूडाचा कारखाना नाही, पण ज्या पद्धतीने तुम्ही वागताय, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्हालाही मित्र परिवार आणि तुमचेही व्यवहार तसेच व्यापार आहेत. तुमच्याही चोऱ्यामाऱ्या उघड झालेल्या आहेत. आज सत्ता आहे म्हणून तुम्ही दाबताय. या ड्रग्ज प्रकरणाच्या मुळाशी जाऊन गृहमंत्र्यांनी सत्य शोधून काढले पाहिजे", अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली.