
मुंबई | Mumbai
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल एका मुलाखतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या मुलाखतीत (interview) राज ठाकरेंना एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वयंभू असल्याचे म्हणत मी काय बोलणार? असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे...
राऊत म्हणाले की, होय आम्ही स्वयंभूच आहोत, शेंदूर फासलेले दगड नाही. स्वयंभू दैवतं असतात त्यांच्या मागेच जनता जाते. शेंदूर फासलेल्या दगडांच्या मागे जात नाही. कुणी दगडांना शेंदूर फासतात आणि आता यांना नमस्कार करा असे सांगतात त्यांना लोक नमस्कार करत नाहीत. जे स्वयंभू असतात त्या स्वयंभू नेत्यांना आणि देवतांना मान मिळतो. ते स्वयंभू नेते ठाकरे कुटुंबीय आहे. यामुळे जर कुणाला पोटदुखी होत असेल तर त्यांनी सांगावे आमच्याकडे उपचार आहेत. असे म्हणत राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
दरम्यान, राऊत यांनी राज ठाकरे यांची तुलना शेंदूर फासलेल्या दगडाशी (Stone) केल्याने आता मनसेकडून (MNS) राऊत यांना काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.