
मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी माजी नगरसेविका व शिवसेना (शिंदे गट) नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांचा एका रॅलीमधील व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्याचे पडसाद राज्यात सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) देखील उमटले आहेत. याप्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे...
राऊत म्हणाले की, "राज्यात सध्या 'मुका घ्या मुका' सिनेमा सुरू आहे. दादा कोंडके हवे होते. त्यांचा 'मुका घ्या मुका' हा सिनेमा खूप गाजला होता. पण, 'मुका घ्या मुका' प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे? त्यांचा संबंध काय? हा सत्ता आणि पोलीस यंत्रणेचा (Police System) गैरवापर आहे." असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, "मला असंख्य कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांचे फोन येत आहेत. आमच्या घरी आणि कार्यालयात पोलीस आलेत. हा काय प्रकार चालू आहे. मुळात व्हायरल झालेला तो व्हिडीओ खरा की खोटा अगोदर ते समोर येऊ द्या. मी तो व्हिडीओ पाहिलेला नाही. तसेच सुरुवातीला प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्याला अटक का नाही, पहिले गुन्हेगार सुर्वे आहेत, असा आरोपही राऊतांनी केला.
तसेच राऊत पुढे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे परिवार, सहकारी यांच्या बाबतीत खोटे गुन्हे दाखल करणे, एखादा व्हिडिओ मॉर्फिंगचा विषय असेल फक्त शिवसेना आणि ठाकरे परिवार यांना लक्ष करून राजकारण सुरू असून ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा डाव आहे, असे त्यांनी म्हटले.