कोकणात जन्मलेले साने गुुरुजी यांची कर्मभूमी अमळनेर होती. विनोबा भावे यांनी सांगितलेली गीता प्रवचने त्यांनी धुळे तुरुंगात लिहिली. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात लिहिली. जळगाव, धुळे, नाशिक या तिन जिल्ह्यातच त्यांचा जीवनातील मोठा भाग राहिला.

तत्वज्ञानाचा अभ्यास

साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगडमध्ये झाला. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एमए ही उच्च पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.

काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त

साने गुरुजी यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. पत्री या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.

हरिजनांना मंदिर प्रवेशासाठी उपोषण

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजी यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला. या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

संवेदनशील साहित्यिक

साने गुरुजी यांनी तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यामधून संवेदनशील साहित्यिक आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली.

राष्ट्र सेवा दलाची स्थापना

साने गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जातिधर्मातीतता, समता. विज्ञानाभिमुखता इत्यादींची शिकवण देण्यासाठी या संघटनेची स्थापना त्यांनी केली.

साने गुरुजींवर चित्रपट

साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या कादंबरीवर आधारित चित्रपट १९५३ साली पडद्यांवर झळकला. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. माधव वझे, वनमाला व दामूअण्णा जोशी या अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या आहेत. १९५४ साली या चित्रपटाला भारतीय केंद्रशासनातर्फे दिला जाणारा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

सानेगुरुजींचा जीवन प्रवास

नाव:- पांडुरंग सदाशिव साने

जन्म:- २४ डीसेंबर १८९९, पालघर ,ता. दापोली, जी. रत्नागिरी

शिक्षण:- एम.ए. (मराठी,इंग्रजी,संस्कृत) उत्तीर्ण

शिक्षक कारकीर्द :-

१७ जून १९२४ : खान्देश एज्यूकेशन सोसायटीच्या हायस्कूल मध्ये(सध्याचे प्रताप हायस्कूल) शिक्षक.

१९२५ ते १९३० : संस्कारक्षम व राष्ट्रीय वृत्तीने धडपडणाऱ्यासाठी विविध माननीयांचे चरित्र लेखन केले.

२९ एप्रिल १९३० : कायदेभंग चळवळीत भाग घेण्यासाठी शाळा सोडली.

१९३१ : पुन्हा शाळेत दाखल.

चळवळीतील सहभाग :-

खान्देशात सत्याग्रह व कायदेभंग चळवळीचा प्रचार. अमळने येथे अटक,प्रारंभी धुळे व नंतर त्रीचनापाल्लीच्या तुरुंगात. एकूण ११ महिने कारावास. आंतरभरतीची कल्पना या तुरुंगात सुचली.

१९३१- अमळनेर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड.

१७ जानेवारी १९३१ ते ऑक्टोबर १९३३ –अमळनेर येथील सभेनंतर अटक. दोन वर्षाचा कारावास. धुळे येथील तुरुंगात अचार्य विनोबा भावे यांचा सहवास. विनोबांच्या गीता प्रवचनाचे श्रुतलेखन.

ऑगस्ट १९३२ –धुळ्याहून नाशिक तुरुंगात रवानगी. नाशिक तुरुंगात‘श्यामची आई’,‘धडपडणारी मुले’ आदी प्रसिद्ध पुस्तकांचे लेखन.एकूण कारावास २२ महिने.

२६ जानेवारी १९३४- वैयक्तिक सत्याग्रहात भाग व चाळीसगाव येथे अटक. धुळे येथील तुरुंगात चार महिन्याची शिक्षा. सुटकेनंतर पुण्यात तीन महिने वास्तव्य. यावेळी ‘श्यामची आई’ मधील शेवटच्या ९ रात्री (३७ ते ४५) लिहिल्या.

१९३७ पासून खान्देशातील शेतकरी, कामगारांसाठी कार्य.

१९४२ च्या लढ्यात मुंबईहून भूमिगत कार्य. १८ एप्रिल १९४३ ते १५ जानेवारी १९४५ कारावास.

२४ डिसेंबर १९४६ –पुणे येथील कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

१ मे १९४७ ते १० मे १९४७ –पंढरपूर मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी दहा दिवसांचे उपोषण.

१ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी १९४८- महात्मा गांधीच्या हत्येचे प्रायश्चित्त म्हणून गुरुजींचे २१ दिवसांचे उपोषण.

१५ ऑगस्ट १९४८ –साधना साप्ताहिक सुरु.

मे- जून १९४८ - गुरुजींचा कर्नाटक दौरा. आंतरभारतीच्या कार्याचा प्रसार.

मृत्यू - ११ जून १९५०.