नाशिक । जितेंद्र झवर

समृद्धी महामार्गाच्या कामास गती आली असली तरी गेल्या वर्षात करोना व शेतकर्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या अडचणीमुळे कामाच्या वेगाला काहीसा ब्रेक आला आहे. नगर व नाशिक जिल्ह्यातील 32 शेतकर्यांची प्रकरणे वर्षापासून लवादाकडे प्रलंबित आहेत.

भूसंपादनाची प्रक्रिया न्यायालयीन निवाड्यात जास्त अडकू नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 नुसार लवाद निर्माण करण्यात आला. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत जिल्हाधिकारी/अपर जिल्हाधिकारी यांची लवाद अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येते. त्यानुसार समृद्धी महामार्गासाठी लवादाची निर्मिती झाली. या लवादाकडे नाशिक व नगर जिल्ह्यातील 32 शेतकर्यांनी आपले खटले दाखल केले आहेत. त्यात जमिनीचा योग्य मोबदला न मिळणे, विहिरीची नोंद नसणे, झाडांची नोंद नसणे, घरांचे नुकसान आदी प्रकरणे आहेत.

लवादाने वर्षभरात निर्णय देणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या वर्षात करोनामुळे काही शेतकर्यांच्या सुनावण्या झाल्या नाहीत. तर काही शेतकर्यांची सुनावणी होऊन प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याचा परिणाम काही ठिकाणी कामावर होत आहे. इगतपुरी तालुक्यातील काही शेतकर्यांनी यामुळेच समृद्धी महामार्गाचे काम रोखून धरले आहे.

पर्यावरणाचा विषय गंभीर संवेदनशील

समृद्धी महामार्गामुळे विकासाला वेग येणार आहे. परंतु त्याचवेळी पर्यावरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या मार्गासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली गेली आहे. प्रामाणिक प्रयत्न झाल्यानंतरही वृक्षांची झालेली हानी भरुन येण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. समृद्धी महामार्गावर वृक्ष लागवडीसाठी 900 कोटींची तरतूद केली आहे.

गौण खनिज उत्खनन

समृद्धी महामार्ग जमिनीपासून 15 फूट उंच आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी केली आहे. यासाठी गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. अनेक ठिकाणचे डोंगर सपाट केले जात आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचे हे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा एकंदरीत परिणाम पर्यावरणावर होणार आहे.

इगतपुरी बोगद्याचे काम 60 टक्के

समृद्धी महामार्ग इगतपुरी तालुक्यातून तसा अवघड आहे. डोंगर फोडून बोगदे तयार केले जात आहेत. आठ किमी येणारा व आठ किमी जाणारा असा 16 किमीचा हा बोगदा तयार केला जात आहे. या बोगद्यामध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा हवा व प्रकाश असणार आहे. बोेगद्याचे काम जवळजवळ 60 टक्के पूर्ण झाले असल्याचे पॅकेज 14 चे प्रमुख अहमद खान यांनी सांगितले.

पाऊस कमी होण्याचा धोका

पश्चिम घाटास नैसर्गिक वारसा लाभला आहे. सतत हायस्पीड म्हणजेच चांगले मानण्यात आपण चूक करत आहोत. प्रकल्पातील प्रचंड उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदे यातून गोदावरीच्या खोर्यातील पाऊस कमी होण्याचा धोका आहे. त्याचा परिणाम या भागातील पिण्याच्या, सिंचनाच्या आणि औद्योगिक पाणीपुरवठ्यावर होईल. आदिवासी समाजाच्या उपजीविकेचे प्रश्न कदाचित अधिक तीव्र बनतील.

श्रृती तांबे, समाजशास्त्र विभागप्रमुख, पुणे विद्यापीठ

नाशिक जिल्ह्यातील भूसंपादन पूर्ण

सिन्नर, इगतपुरी तालुक्यातील समृद्धी महामार्गासाठी लागणारी शंभर टक्के जमीन संपादीत झाली आहे. फक्त नाशिकहून समृद्धीस जोडणार्या इगतपुरीजवळील पिंप्री सदो येथील वाढीव जमिनीच्या संपादनाचे प्रस्ताव आले नाही. नाशिकहून जाणारा आहे तो मार्गच मोठा करुन समृद्धीस जोडला जाणार आहे.

विठ्ठल सोनवणे, उपजिल्हाधिकारी, नाशिक