प्रतिनिधी नाशिक

समृद्धी महामार्गाच्या कामात सिन्नर तालुक्यात वेग आला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी पुलाच्या ढाचा, रस्त्याची उंची व भिंतीचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. काही गावांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहे. शिर्डी-सिन्नर राज्यमार्ग व समुद्धी महामार्गाचे जंक्शन असलेल्या गोंद्यात कामाला प्रचंड वेग आहे. परंतु या तालुक्यातील बंधाऱ्याचे पाणी ठेकेदार समुद्धी महामार्गासाठी वापरत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

समृद्धी महामार्गालगत अनेक अधिकाऱ्यांनी जमिनी घेतल्याचा आरोप झाला होता. त्या आरोपाची चौकशी करुन कारवाई अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु काही चौकशी झाली नसल्याचा आरोप सिन्नर तालुक्यातील शेतकरी करत आहे. महामार्गामुळे अधिकाऱ्यांची समृद्धी झाली झाली शेतकऱ्यांची नाही, असे शिवडे येथील शेतकरी रावसाहेब हरक यांनी सांगितले. हरक म्हणाले, ‘समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांसाठी सर्व्हीस रोडची तरदूत २०१६ मध्ये केली होती. परंतु २०२१ मध्ये ही तरतूद रद्द करण्यात आली. यामुळे महामार्गालगत किंवा महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ताच राहिला नाही. जवळपासच्या शेतकऱ्यांचा शेतातून रस्ता काढावा लागणार आहे. एखाद्या शेतकऱ्याने नकार दिल्यास दुसऱ्या शेतकऱ्यास आपल्या शेतात जातच येणार नाही. समृद्धी महामार्गावर करण्यात येणारी सात फुट उंच भिंतीच्या आतून सर्व्हीस रोड आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी रस्ताच असणार नाही.’ समृद्धी महामार्गावर असलेल्या शेतकऱ्यांना सुरु असलेल्या कामाच्या धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. गौण खनिज, खडी, सिमेंट वाहून नेणाऱ्या गाड्यांमुळे प्रचंड धुळ उडत असते. अनेक वेळा या गाड्यांमुळे वीज तारा तुटतात. त्यानंतर शेतातील वीज पुरवठा तीन-चार दिवस ठप्प असतो.

शेतकऱ्यांची खडकाळ जमीन भाड्याने

समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या गौण खनिजासाठी सिन्नर तालुक्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांची खडकाळ जमीन भाड्याने घेतल्याचा चांगला पायंडा पाडला गेला. तसेच या जमिनीतून गौण खनिज काढून त्या ठिकाणी शेततळ्याची निर्मिती करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. खडकाळ जमिनीतून भाड्यामुळे उत्पन्न सुरु झाले आहे. तसेच शेततळ्यात पाण्याचा साठा होणार असून त्यामुळे शेतीला पाणी मिळणार आहे. सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्यातील हा प्रयोग शेतकऱ्यांना समृद्ध करणारा ठरणार आहे.

दुशिंगपूर पाणीसाठा ३५ टक्के झाला कमी

सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर बंधारा दुसरा क्रमांकाचा सर्वात मोठा बंधारा आहे. या बंधाऱ्यावरुन समृद्धी महामार्ग जात आहे. या संपुर्ण बंधाऱ्यावर १.२५ किमीचा रस्ता आहे. रस्त्याची रुंदी १२० मीटर आहे. १.२५ किमी बंधाऱ्यावर केवळ ९० मीटरच्या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कमीत कमी ६०० मीटरपर्यंत पुल करण्याची मागणी होती. परंतु लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या. यामुळे या बंधाऱ्यात मोठा भराव टाकण्यात आला. या भरावामुळे बंधाऱ्यांचे दोन भाग झाले आहे. तसेच पाण्याची साठवण क्षमता ३५ टक्के कमी झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी डॉ.विजय शिंदे यांनी केला.

बंधाऱ्यातील पाण्यावर ढल्ला

दुशिंगपूर बंधाऱ्यासाठी शेतकऱ्यांनी २९८ एकर जमीन दिली. आपल्या शेतीला पाणी मिळेल या अपेक्षेनेच जमीन दिली होती. पाटबंधारे विभागाने ही जमीन समृद्धीच्या रस्त्यासाठी हस्तांतरीत केली. या बंधाऱ्यातील पाणी शेतकऱ्यांसाठी राखीव आहे. परंतु दिलीप बिल्डकॉन या ठेकेदाराकडून सर्रास बंधाऱ्याच्या पाण्याची चोरी केली जात आहे. यामुळे काही दिवसांपुर्वीच डॉ.विजय शिंदे व काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी तात्पुरते पाणी उचल बंद झाले. त्यानंतर पुन्हा ते सुरु झाले. तसेच बंधाऱ्यापासून सायाळेपर्यंत पाटचारी होती. ती ही बंद करण्यात आली. ही चारी पुन्हा करुन देण्याचे आश्वासन सहा महिन्यांपुर्वी एमएसआरडीसीने दिले होते. परंतु त्याचीही पुर्तता झाली नाही.

दुशिंगपूरबंधाऱ्याजवळ कामास वेग

दुशिंगपूर बंधाऱ्याजवळ ठेकेदाराचे कार्यालय आहे. या ठिकाणी बंधाऱ्यातील पाण्यासंदर्भात बोलण्यास तेथील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. बंधाऱ्याजवळ रस्त्याच्या कामाने प्रचंड गती घेतली आहे. या ठिकाणी क्रॉकींटकरण करुन रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला भिंत बांधून तयार आहे.

गोंद्यात जंक्शनचे काम अंतीम टप्प्यात

शिर्डी-सिन्नर राज्यमार्ग व समुद्धी महामार्गाचे जंक्शन असलेल्या गोंद्यात कामाला प्रचंड वेग दिला जात आहे. या ठिकाणी रात्रंदिवस काम चालू आहे. मोठ्या पुलाची निर्मिती करण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. पुलाला लागून असलेल्या रस्त्यावर भराव टाकला गेला आहे. यामुळे पुलाची निर्मिती होतात रस्ता त्याला जोडण्यात येणार आहे. दुसरीकडे शिर्डी-सिन्नर राज्य मार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. यामुळे भविष्यात शिर्डीला जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असणार आहे.