Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यासमर्पित आयोग नाशिक दौर्‍यावर

समर्पित आयोग नाशिक दौर्‍यावर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ( Local Body Elections ) नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ओबीसी, व्हिजे-एनटी यांना आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाचा ( Samarpit Aayog )राज्यभर विभागस्तरावर भेटींचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 22 मे, 2022 रोजी आयोग नाशिक विभागीय दौर्‍यावर असून, या दौर्‍यात नागरिकांची व या क्षेत्रात काम करणार्‍या विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांची निवेदने स्विकारण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात अगोदर नाव नोंदणी करावी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, शहरी क्षेत्रातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास म्हणजे ओबीसी, व्हिजे-एनटी यांना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.

या आयोगाने राज्यातील या क्षेत्रात काम करणार्‍या विविध सामाजिक संघटना व नागरिकांची मते जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून 21 मे ते 28 मे या कालावधीत राज्यातील विविध विभागात भेटीचा कार्यक्रम घोषित केला आहे. घोषित दौर्‍यानुसार आयोग रविवार, 22 मे, 2022 रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत भेट देणार आहे.

अगोदरच करावी लागणार नाव नोंदणी

या क्षेत्रात काम करणार्‍या नाशिक विभागांतर्गत असलेल्या नाशिक, जिल्ह्यातील ज्या सामाजिक संघटना व नागरिकांना आपली मते व निवेदने आयोगासमोर सादर करावयाची आहेत त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड, नाशिक येथे आयोगाच्या भेटीअगोदर नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

आयोग भेटीचा कार्यक्रम

* रविवार 22 मे, 2022 सायंकाळी 5.30 ते 7.30 विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक

* नागरिक व सामाजिक संस्था निवेदनाद्वारे आपली मते मांडू शकतात.

* भेटीसाठी नागरिक व संस्था यांना अगोदरच नोंदंणी करावी लागणार

- Advertisment -

ताज्या बातम्या