Monday, April 29, 2024
Homeक्रीडासलीम दुराणींना सलाम

सलीम दुराणींना सलाम

नाशिक | डॉ अरुण स्वादी |Nashik

सलीम दुराणीना (Salim Durrani) ज्यांनी खेळताना पाहिले आहे ते क्रिकेट (Cricket) रसिक अतिशय नशीबवान आहेत. कारण त्यांनी, कोणत्याही अँगलने पुरेपूर फिल्मी हिरो दिसणाऱ्या एका अफलातून अष्टपैलू खेळाडूला पाहिले आहे.

- Advertisement -

सलीम दुराणी मूळचे अफगाणिस्तानचे (Afghanistan) म्हणजे भारताकडून खेळलेले ते पहिलेच, अफगाणिस्तानमध्ये जन्मलेले खेळाडू! आज आपण पाहतोच आहोत, अफगाणिस्तानच्या टीम मधले बरेचसे खेळाडू किती नैसर्गिक आणि हरहुन्नरी खेळ करतात. मग तो रशीद खान (Rashid Khan) असो किंवा मोहम्मद नबी वा गुरबाझ (Muhammad Nabi wa Gurbaz) किंवा फझल हक फारूकी (Fazal Haque Farooqui); त्यांच्या खेळात एक वेगळीच प्रतिभा असते. एक आगळीच ताजगी असते. सलीम दुराणी त्या वेळेला असेच खेळायचे.

फलंदाजीला आले की, आपल्याला दोन-चार षटकार मारलेले दिसणार याची प्रेक्षकांना खात्री असायची आणि ते तशी मागणी पण करायचे. सलीम दुराणीने त्यांना फारसे निराश केले नाही. अगदी त्या काळातल्या फास्टिश स्पिनर (Fastish spinner) अंडरवुडला क्रिझ सोडून पुढे सरसावत मारलेला पब्लिककी डिमांड वाला छक्का असो. सलीम बॉस राहिले. चेन्नईला (Chennai) चौथया डावात भारताला ७५-८० धावा करायच्या होत्या, पण फलंदाजी पार ढेपाळली होती. चेंडू हातभार वळत होता.

गिफर्ड दादागिरी करीत होता. सलीमने त्याला दोन उत्तुंग छक्के मारून मॅच संपवली. आज ज्या सहजतेने षटकार मारला जातो तसं पूर्वी नसायचे. आजकाल तर मिस् हिट पण मैदानाबाहेर जातो, पण सलीम अंकल अगदी लीलया छ्क्के मारायचे. त्यामुळे ते लोकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. त्यांना ब्रेबोर्न कसोटीतून वगळले तेव्हा ‘नो सलीम नो टेस्ट’चे बोर्ड सगळीकडे लागले होते. हीच त्यांच्यावरच्या प्रेमाची पावती! गोलंदाजी मात्र ते टिच्चून करायचे. डावरे फिरकी गोलंदाज असल्याने उंचीचा फायदा घेत ते फलंदाजाला क्रिझबाहेर यायला प्रतिबंध करायचे.

विकेट खराब असेल तर सलीम दुराणी निव्वळ अन् प्लेयेबल असायचे. फक्त गोलंदाजीच्या बळावर त्यांनी भारताला सामने जिंकून दिले आहेत. त्यावेळी एका मालिकेत डावरा सलीम आणि लेग स्पिनर बोर्डे यांनी इंग्लंडविरुद्ध (England) मालिका जिंकून दिल्याचे आठवते. क्षेत्ररक्षणाचा मात्र त्यांना कंटाळा असायचा. तसा तो बऱ्याच जणांना असायचा. शक्य असेल तर एखादा नोकर फिल्डिंगला ठेवायचा जमाना होता तो, पण तेंव्हाही उम्रीगर, पतौडी किंवा बोर्डे असे उत्तमोत्तम फिल्डर होतेच. तेवढे एक सोडले तर सलीम दुराणी उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरावेत. अगदी सर गारफील्ड सोबर्स देखील त्यांचा चाहता होता.

तरीही त्यांना इंग्लंड दौऱ्यासाठी कधीही निवडले गेले नाही. त्यांना विचारले तर ते म्हणायचे, ‘मला तिथली थंडी सहन होणार नाही असे निवड समितीला वाटत असेल’; पण मग ऑस्ट्रेलियाला (Australia) पण गेला नाहीत तुम्ही, असे विचारल्यावर ते म्हणायचे ‘तिथली गरमी मला सहन होणार नाही, असेही त्यांना वाटत असेल’. माझ्या आठवणीप्रमाणे पोर्ट ऑफ स्पेनला (Port of Spain) त्यांनी लॉइड व सोबर्सच्या पाठोपाठ विकेट घेऊन भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला होता.

तो दौरा गाजवला नवख्या सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि अनुभवी दिलीप सरदेसाई (Dilip Sardesai) ने धावांचा पाऊस पाडून; पण या मालिकेतली डिफायनिंग मुमेंट होती त्यांचे हे दोन बळी! सोबर्स तर आपले खातेही उघडू शकला नव्हता. तरीही वाडेकरच्या विजयी इंग्लंड दौऱ्यात तो नव्हताच! सलीमना त्याचे दुःख वाटत असेलही, पण त्यांनी ते कधीही दाखवले नाही. सलीम दुराणीचे मोठेपण त्यांनी काढलेल्या २९ कसोटीतील १२०२ धावा किंवा ७४ विकेट यात प्रतिबिंबित होणार नाही. त्या काळात फारशा कसोटी व्हायच्या नाहीत.

मुंबईची स्ट्राँग लॉबी असायची. बाकीही अनेक कारणे असायची. ज्यामुळे फॉर्मात असलेल्या खेळाडूला सातत्याने संधी मिळायची नाही, पण तेंव्हाही सलीम दुराणी आपला मॅचविनर होता. तो मैदानावर ज्या रुबाबदारपणे वागायचा ते पाहून लोक त्याला ‘प्रिन्स सलीम’ म्हणायचे. कदाचित ते पाहून आपल्या युवराज सिंगची आठवण येईल. एक मात्र खरे, सलीम दुराणीच्या निधनामुळे भारतीय क्रिकेटमधील ६०-७० च्या जमान्यातील ग्लॅमर नाहीसे झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या