Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याPhoto ग्रंथदिंडीच्या अभूतपुर्व सोहळ्याने साहित्य संमेलनास प्रारंभ

Photo ग्रंथदिंडीच्या अभूतपुर्व सोहळ्याने साहित्य संमेलनास प्रारंभ

नाशिक प्रतिनिधी Nashik

कडाक्याच्या थंडीत पडलेले धुके…रांगोळ्या, झब्बे, साड्या आणि फेट्यांनी साधलेला रंगांचा मेळ…ढोल ताशांचा गजर… संबळने धरलेला पारंपरिक ठेका.. त्याच्या तालावर रंगलेला लेझीमचा खेळ…आकाशात उंच उसळणारे ध्वज…अशा थाटात ग्रंथदिंडीने 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची (sahitya sammelan)सुरूवात आज करत नांदी पेश केली. पावसानेही उसंत घेऊन जणू काही नाशिककरांच्या उत्साहाला दाद दिली. अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस, गोठवणारी थंडी आणि त्यामुळे काहीसे शांत झालेले नाशिक (nashik)याच्या पार्श्वभूमीवर ग्रंथदिंडी निघेल का? ठरलेल्या मार्गानेच जाईल का? ग्रंथदिंडीत लोक आणि तरुणाई सहभागी होतील का? या सगळ्या शंका काल सकाळी निमाल्या. ग्रंथदिंडीत सहभागी होणारे आणि दिंडीबरोबर चालणारांची एकच गर्दी झाली आणि ते बघून आयोजकांचेही चेहरे फुलले.

- Advertisement -

या भव्य ग्रंथ दिंडीची सूरूवात कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून झाली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal), उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादा भुसे (dadaji bhuse)व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील (kautikrao thale patil )यांच्या हस्ते दिंडींचे पुजन करण्यात आले.यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आ. हिरामण खोसकर, माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पांडे , उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी नितीन मुडांवरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, निमंत्रक-प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगांवकर, संमेलनाच्या सर्व समितींचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकुर, प्राचार्य प्रशांत पाटील, ग्रंथदिंडीच्या समितीचे सदस्य समन्वयक विनायक रानडे, मंगेश बिरारी यांच्यासह लेखक, कवी, साहित्यिक, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व साहित्यप्रेमींनी उपस्थिती लावली होती.

चित्ररथ व देखाव्यांचा सहभाग

ग्रंथदिंडीच्या सर्वात पुढे नटसम्राट नाटक केलेले सोलापूर येथील शेतकरी तथा रंगकर्मी साहित्यिक फुलचंद नागटिळक हे संत गाडगेबाबा यांची वेशभूषा करत हातात खराटा घेऊन रस्त्याची स्वच्छता करित होते. शालेय विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणी ,संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई, छत्रपती शिवाजी महाराज, वासुदेव, सावित्री फुले,स्वातंत्र्यवीर सावरकर, म. ज्योतीबा फूले अश्या विविध वेशभूषा साकारल्या होत्या. यावेळी स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर यांच्या पुस्तकांचा देखावा चित्ररथावर साकारण्यात आला होता.

भुजबळ झाले विणेकरी

प्रत्येक दिंडीमध्ये विणेकरी असणार्‍या व्यक्तीला विशेष मान असतो. या दिंडीमध्ये संमेलनाध्यक्ष यांची अनुपस्थिती असल्याने दिंडीची धुरा भुजबळांनीच सांभाळली. कुसुमाग्रज निवासस्थान ते सार्वजनिक वाचनालय नाशिक या दिंडीमार्गावर स्वतः पायी मार्गक्रमण करत पालकमंत्री भुजबळांनी पालकत्वाची भूमिका निभावली. यावेळी ग्रंथ दिंडीत वीणा हातात धरून त्यांनी ठेका देखील धरला. संपूर्ण दिंडीची धुरा त्याच्या खांद्यावर असल्याचे स्पष्ट झाले.यावेळी विधानसभा उपसभापती आ. नरहरी झिरवाळ व आ. हिरामण खोसकर यांनी देखिल टाळवाजवत मृदूंगाच्या गजरात ठेका धरला.

कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांचा उत्साह

ग्रंथदिंडी मध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग ही महत्वपुर्ण बाब ठरली. कोविड लसीकरण नसतांना देखील विद्यार्थ्यांमध्ये कडाक्याच्या थंडीत उत्साह दिसून आला. गेल्या दोन दिवसांपासून नाशकात ढगाळ वातावरण व पावसामुळे हवेतील गारवा मोठ्या प्रमाणात वाढला होता मात्र कडाक्याची थंडी असून देखील पहाटेपासूनच विविध वेशभूषा करत नाशकातील 20 शाळांमधील सुमारे दोन हजार मुलांनी ग्रंथदिंडी मध्ये सहभाग घेतला. शाळकरी मुलांचे लेझीम पथक, वारकरी वेशभूषा, राष्ट्रपुरुषांची वेषभुषातसेच मल्लखांब प्रात्यक्षिक करत दिंडीद्वारे सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवले. शाळकरी मुलींनी सुप नाचवणे, फुगडी सारखे पारंपरिक खेळ खेळत दिंडीमध्ये रंगत आणली.

मविआचाच बोलबाला

या ग्रंथदिंडीला संमेलनाध्यक्ष डॉ.नारळीकर आणि मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो उपस्थित नव्हते. परिणामी सगळी धुरा स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या खांद्यावर होती. त्यांनी सकाळपासून उपस्थित राहून आयोजकांचा उत्साह वाढवला. त्यांच्यासोबत विधानसभा उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ, काँग्रेसचे हिरामण खोसकर, कृषिमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दादा भुसे उपस्थित होते. शहराचे प्रथम नागरीक महापौर सतीश कुलकर्णी होते. ज्या भागातून ग्रंथदिंडीचा मार्ग होता तो मार्ग भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघातील होता. तरीदेखील शहरातील तीन भाजप आमदारांची अनुपस्थिती दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. महापौर वगळता भाजपच्या आमदारांच्या अनुपस्थितीमुळे ग्रंथदिंडीमध्ये महाविकास आघाडीचाच बोलबाला दिसून आला.

निर्बंधांचा फज्जा

करोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक असतांना बर्‍याच जणांनी मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष केले. तसेच ग्रंथदिंडी सुरु होण्यापूर्वी सर्वांनी मास्कचा वापर केला मात्र, बरेच सेल्फी काढण्यात व्यस्त असल्याने त्यांनी मास्कचा वापर टाळला. नंतर ग्रंथ दिंडीचा उत्साह वाढल्याने मास्कचा व सुरक्षित अंतर च्या नियमांचे पालन झाले नाही.

पोलीस आयुक्त देखील दिंडीत सहभागी

ग्रंथदिंडीमध्ये काही लक्षवेधी दिंडी होत्या. त्यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पोलिसांचे मुखपत्र असलेल्या ‘दक्षता’ या नियतकालिकाची दिंडी आयोजित केली होती. त्यामध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या