दै.'देशदूत'आयोजित 'सफर गोदावरीची’ उपक्रम : गोदावरची कथा आणि व्यथा

गोदावरीच्या तळातील काँक्रीट काढलेच पाहीजे : देवांग जानी
दै.'देशदूत'आयोजित 'सफर गोदावरीची’ उपक्रम :  गोदावरची कथा आणि व्यथा

नाशिक | प्रतिनिधी

नशिकची ओळख गोदावरी, गावाचा श्वास गोदावरी नदी आहे. ती नसली तर आपले जगणे मुश्किल होईल यासाठी गोदावरीच्या तळातील काँक्रीट काढून तिला मुक्त करणे व प्रवाहीत ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गोदावरी प्रेमी देवांग जानी यांनी केले.

दै. 'देशदूत'च्या सफर गोदावरी’ या उपक्रमातून जुलै महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'गोदावरीची कथा आणि व्यथा' हा कार्यक्रम जानी हाऊस, पंचवटी येथे घेण्यात आला.

गोदावरी नदीच्या तळातील काँक्रीट पूर्णपणे काढले जावे व १७ प्राचीन कुंड पुनर्रर्जिवीत व्हावीत या साठी देवांगजानी यांनी न्यायालयीन याचिका दाखल केली आहे. गोदावरीच्या इतिहासासह वर्तमानातील अवस्थेची माहीती देवांग जानी यांनी उपस्थित स्वामी विवेकानंद शाळातील तसेच आयडिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिली.

व्हिसलमॅन व सफर गोदावरीचीचे समन्वयक चंद्रकिशोर पाटील यांनी उपक्रमाचे महत्व विषद करत मुलांंना आपल्या परीने गोदावरीच्या स्वच्छतेची जबाबदारी कशी घेता येईल या बाबत प्रबोधन केले. गोदावरी नदी स्वच्छ निर्मल व अविरल राहण्यासाठी उपाय योजना करताना जनसामान्यामध्ये जागरुकता आणण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होण्याची गरज असल्याचे सांगितले. नदी पात्रात निर्माल्य कचरा टाकणार्‍यांना केवळ दंडात्मक कारवाई हा उपाय नसून, नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने याबाबत जागरुकता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी, संवाद साधताना देवांग जानी म्हणाले कि काँक्रीटमुळे गोदावरीचा कोंडलेला श्वास मोकळा करुन गोदावरी बारमाही प्रवाहीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत . पुढच्या पिढीला गोदावरीच्या सांस्कृतीक वारशांची ओळख करुन देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

जानी पुढे म्हणाले की, गोदावरीचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच तिचे पावित्र्य अबाधित राहावे, तसेच गोदावरीचा इतिहास आणि तिचे महत्व समजून घेणे गरजेचे आहे. नदीतील जलस्त्रोतांचा श्वास काँक्रीटमुळे कोंडलेला आहे. तो श्वास मोकळा करण्यासाठी शासन स्थरावरुन लढा सूरु असला तरी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

गोदावरीचे महत्व पटवून देताना त्यांनी ऐतिहासिक दाखले दिले. लक्ष्मण कुंडातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवले जायचे . हे कुंड रामकुंडाचा वरच्या बाजूला असून त्याचा वापर इतर कुठल्याही करणासाठो होत नसे. तसेच अहिल्याबाई होळकरांनी १७६६ साली अहिल्याकुंड बांधण्यास सुरुवात केली मात्र या कुंडाला पूर्ण करण्यासाठी गोदावरीच्या प्रचंड जल प्रवाहामुळे २९ वर्ष लागल्याचा दाखला सांगून, आजच्या गोदावरीच्या स्थितीबद्दल नापसंती व्यक्त केली. आपल्या कायदेशिर लढ्यामुळे नदी पात्रातील पाच कुडांतून सुमारे साडे तीन लाख किलो काँक्रीट काढले गेले आहे त्यामुळे नदी पात्रातील बरेच स्त्रोत मोकळे होण्यास मदत झाली आहे, मात्र अजून बरेच काम बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

रामकुंडातही अरुणा नदीसह मोठ्या प्रमाणात जिवंत जलस्त्रोत असून, त्या कुंडातून आणखी दिड लाख किलो काँक्रिट काढल्यास सुप्त जलस्त्रोत प्रवाहीत होण्यास मदत होणार असल्याचे नमुद केले. गोदावरी दक्षिणेकडे वळाल्याने त्याठिकाणी अरुणा नदीचा सुप्त संगम होत असल्याने येथे कुंभमेळा भरत असल्याचे नमुद केले.

'देशदूत' व 'देशदूत टाइम्स' च्या संपादक डॉ.वैशाली बालाजीवाले यांनी नदीचा इतिहास, तिचा प्रवाह ,नदीचे महत्व या विषयी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. गोदावरीच्या संवर्धनाचा ऐतिहासिक वारसा त्यांनी यावेळी विषद केला. नदीमुळे नाशिकचे जीवन सुरक्षित असल्याचे सांगून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांंना पाण्याचे महत्व पटवून दिले. प्रत्येकाने जल संवर्धनासह पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नमुद केले.

उपायुक्त व गोदावरी संवर्धन कक्षाचे प्रमुख विजयकुमार मुंडे यांनी गोदावरी संवर्धनाबाबत मनपाच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या उपाय योजनांची माहीती दिली. नदी प्रवाहीत राहिली तर स्वच्छ राहणार आहे.गोदावरीत प्रदूषण वाढवणार्‍या गोष्टी निदर्शनास आल्यास अथवा कोणतीही नदी बद्दलची तक्रार असल्यास मनपाच्या इ-कनेक्टच्या माध्यमातून सुचना अथवा तक्रार दाखल केल्यास त्याची तातडीने दखल घेऊन उपाय योजना करणे शक्य होणार असल्याचे सांगितले. नागरीकांनी अ‍ॅपवर आपल्या गोदावरी बाबतच्या समस्या व सुचना मांडाव्यात असे आवाहन डॉ. मुंडे यांनी केले.

आयडिया कॉलेजच्या प्रा.उल्का पवार यांनी नाशिकच्या ऐतिहासिक वारस्यांत गोदावरी व परिसरातील पुरातन मंदिरांचे महत्व मोलाचे असल्याचे सांगितले. यामुळे नाशिकच्या आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळत असल्याचे सांगितले. यावेळी आयडीया कॉलेजची विद्यार्थीनी अस्मिता शिंदे हीने नाशिकच्या पुरातन वाड्यांच्या वसाहतींचे महत्व सांगितले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रथमच क्रमिक अभ्यासक्रमाबाहेरची ऐतिहासिक वारशांची माहीती मिळाल्याने मुलांमध्ये कुतूहल दिसून आहे. देवांग जानी यांच्या वाड्यात असलेल्या जिवंत झऱ्याच्या सानिध्यात ‘सफर गोदावरीची’ या विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले होते यात गोदा प्रेमी नंदू पवार, चिराग गुप्ता, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे ए.बी.जाधव, एस.एम.चांंगटे, जे.एम.अहिरे,बी.एस.गावीत आदींसह स्वामी विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी व आयडीआय महाविद्यायाचे विद्यार्थी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com