Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याRTE प्रवेश पुन्हा लांबणीवर; लाॅकडाऊनचा दुसऱ्यांदा फटका

RTE प्रवेश पुन्हा लांबणीवर; लाॅकडाऊनचा दुसऱ्यांदा फटका

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण (आरटीई) अंतर्गत होणारे प्रवेश पुन्हा लांबणीवर गेले आहेत. गतवर्षी करोनामुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये हे प्रवेश लांबले. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरु राहिली. यंदा सुध्दा अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते.

- Advertisement -

गुरुवारपासून सोडतीनुसार पात्र पालकांना प्रवेशाच्या सूचना मिळाल्या. पण, संचारबंदी लागू होताच प्रवेशाचा निर्णय लांबणीवर गेला आहे. संचारबंदीचे निर्बंध उठल्यानंतरच प्रवेशासंदर्भातील निर्णय होईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे ई-प्रणालीद्वारे कागदपत्रांची पडताळणी होणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशासाठी गेल्या आठवड्यात सोडत काढण्यात आली. १५ एप्रिल रोजी सोडतीत नावे असलेल्या पालकांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात आले.

यानुसार १९ एप्रिलपासून प्रवेश निश्चिती सुरु होईल, असे सांगण्यात आले. मात्र, करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बुधवारी संचारबंदी लागू झाली.

यामुळे हे प्रवेश कसे होणार हा संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, गर्दी टाळण्याच्या उद्देशाने पालक व्हॉटसअॅप किंवा ई-मेलद्वारे कागदपत्रांच्या प्रती पाठवू शकतात. तसेच ई-स्वरुपातच कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर शुल्क भरुन तात्पुरता प्रवेश दिला जाईल, असा निर्णय घेण्यात आला.

आता थेट संचारबंदीचा निर्बंध उठल्यानंतरच प्रवेशासंदर्भातील निर्णय घेण्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. कदाचित ई-स्वरुपातील कागदपत्र पडताळणी सुध्दा सध्या शक्य नाही. यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही जून-जुलैपर्यंत प्रवेश रखडण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या