
- डॉ अरुण स्वादी
विश्वचषक स्पर्धा अर्ध्या टप्प्यावर आली असताना सगळ्यात चांगली टीम भारताची वाटत असली तरी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली टीम दक्षिण आफ्रिकाच वाटते. त्यांचे पहिले सहाच्या सहा फलंदाज प्रचंड फार्मात आहेत गोलंदाज विलक्षण सातत्याने गोलंदाजी करीत आहेत. थोडीफार कमतरता आहे ती फक्त स्पिन डिपार्टमेंटमध्ये, पण समसी तंबूतच बसलेला आहे.
प्रत्यक्ष मैदानावर त्याला फारशी संधी मिळत नाही. कदाचित बाद फेरीत हे म्यान केलेले अस्त्र बाहेर काढण्यात येईल. बांगलादेशविरुद्ध ज्या पद्धतीने दक्षिण आफ्रिकेने हल्लाबोलचा नारा लावला आणि ३८२ धावा बुकलल्या ते पाहता बाकीच्या संघांच्या हृदयाची धडधड वाढलीच असेल. क्विंटन डी कॉक आघाडीला येऊन प्रतिस्पर्धी गोलंदाजांची खांडोळी उडवतोय.
तीन नंबरचा फलंदाज दुसेदेखील थोड्याफार प्रमाणात तेच करतोय. मारक्रम गोलंदाजांच्या मागे हात धुवून लागला आहे आणि क्लासेन का तो जवाब नही! त्याची बॅट समोरच्या गोलंदाजांचा खिमा करीत आहे. तो इतक्या विलक्षण सहजतेने खेळतो आहे की, त्याचे मैदानावरचे आगमन प्रतिस्पर्ध्याला धडकी भरवणारे ठरू शकते. त्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरलेली आहे, पण दक्षिण आफ्रिकन निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही.
आता कुठे त्यांचे डोळे उघडले आहेत. क्लासेन कमीत कमी श्रम करून जास्तीत जास्त ताकदीने फटके मारतो. लॉंग ऑन व लॉंग ऑफच्या पट्ट्यात तर त्याचा विलक्षण दरारा आहे. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करायचे असेल तर या वादळाला थोपवणे आवश्यक आहे. डेव्हिड मिलरने काही उपयुक्त खेळया केल्या, पण पूर्ण फुलायला त्याला संधी मिळालेली नाही. त्यात भर पडली आहे यान्सन या अष्टपैलू खेलाडूची.
बांगलादेशला या फलंदाजीला आवर घालता आला नाही. ते पार खचून गेले. सामना बांगलादेशचा स्कोर ४२/४ असताना संपल्यागत होता. मेहमूदुल्लाच्या शतकाने त्यांची अब्रू वाचली, पण तरीही मोठा पराभव झालाच. बांगलादेश त्याच्या या ज्येष्ठ फलंदाजाला इतके खालच्या नंबरवर का पाठवते हे एक कोडेच आहे.
ही विश्वचषक स्पर्धा त्यांच्याकरता संपली आहे. मात्र दक्षिण आफ्रिका यावेळी स्पेशल क्रिकेट खेळत आहे. मागच्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड असेच खेळत होते. आणि त्यांनी स्पर्धा जिंकली देखील! ते बझ क्रिकेट यावेळी आफ्रिकेला पहिला-वहिला करंडक जिंकून देईल? अहमदाबाद अब भी दूर है!