Round The Wicket: लंकादहन!

Round The Wicket: लंकादहन!

- डॉ अरुण स्वादी

वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी संध्याकाळी दिवाळीपूर्व फटाक्यांचा धमाका होता. भारतीय फलंदाजांनी एका मागोमाग एक असे भुईनळे लावले आणि गोलंदाजांनी तर ॲटम बॉम्बच फोडले. हतबुद्ध श्रीलंकन खेळाडूंच्या डोळ्यांसमोर मात्र त्यामुळे काजवे चमकले. अशी शोभेची दारू आणि बॉम्ब उडवले जातील हे त्यांच्या स्वप्नातसुद्धा आले नसेल.

कर्णधार रोहित शर्माने पहिल्या चेंडूवर चौकार मारून फटाका फोडला. लगेच तो बादही झाला, पण त्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी फटक्यांची माळ लावली. श्रेयस अय्यर तर स्टेडियम पेटवायच्या मूडमध्ये होता. उत्तुंग षटकार मारत त्याने केलेल्या ८१ धावा म्हणजे त्याचे करिअरचे पुनरुज्जीवन ठरावे. चेंडू बॅटवर येत असेल तर श्रेयस वाघ असतो आणि स्पिनरवर झडप घालून त्यांना भक्ष्य करतो किंवा दावणीला बांधून ठेवतो. मात्र श्रीलंकेने त्याला मिडल स्टंपवर उसळते चेंडू जरा कमीच टाकले. त्यामुळे त्याचे फावले.

एकूणच, भारतीय फलंदाजांनी फटाक्याची माळ लावली आणि ३५७ धावांचा मोठा डोंगर लंकेसमोर उभा केला. लंका हे आव्हान स्वीकारेल आणि काही आतषबाजी करेल असे वाटत होते पण आता गोलंदाजांनी ॲटम बॉम्ब फोडणे बाकी होते. बुमराहने निसंकाचा आपल्या पहिल्या चेंडूवर बळी मिळवला आणि सिराजने आपल्या पहिल्या षटकात दोन बळी घेऊन लंकादहन केले.

त्यानंतर मोहमद शमीने तर सुरुंग लावला आणि काही क्षणात श्रीलंकेची ६ बाद १४ अशी दयनीय अवस्था केली. शमी सध्या खेळायला अशक्य अशा टप्प्यावर गोलंदाजी करतो आहे आणि दोन्हीकडे सिम पण करतो आहे. त्यामुळे तो सध्या अतिशय घातक गोलंदाज झाला आहे. लंकेच्या फलंदाजांनी काही नशीबवान धावा काढल्या म्हणून; नाही तर धावांचा नीचांक त्यांच्या नावे लागला असता.

आता चर्चा होईल नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याच्या श्रीलंकेच्या कर्णधाराच्या निर्णयाची! उशिरा संध्याकाळी खेळपट्टीवर थोडे दव पडते या भीतीपोटी तर मेंडीसने गोलंदाजीचा निर्णय घेतला नव्हता? शिवाय कृत्रिम प्रकाशात विकेट थोडीशी नरम होते हा इतिहास आहे, पण पहिल्या दहा षटकानंतर विकेट हे रूप बदलते हा इतिहास आहे.

त्यामुळे मेंडीसचा निर्णय एकदम चुकीचा नव्हता. आता त्यांच्या फलंदाजांनी पहिल्या १० ओवर्समध्येच प्राण सोडले; त्याला कोण काय करणार? श्रीलंकेच्या तेज गोलंदाजांनीसुद्धा पहिल्या काही षटकांत सुरेख गोलंदाजी केली होती, पण कोहली आणि गिल, दोघांचे झेल सुटले.

एरवी भारताला कठीण परिस्थितीशी सामना करायला लागला असता. सूर्यकुमार यादवने गेल्या सामन्यात महत्त्वाच्या ४९ धावा काढल्या होत्या, पण यावेळी पुन्हा त्याने 'ये रे माझ्या मागल्या' केले. तो टी-ट्वेंटीच्या मोडमधून बाहेरच पडत नाही. जवळजवळ १० षटके बाकी होती. कोणताही वाघ मागे लागला नव्हता, पण याने घाई करून एका स्लो बाऊंसरवर आपली विकेट दिली. थांबला असता तर त्याने शेवटच्या पाच ओवरमध्ये ४० -५० धावा केल्या असत्या. हे असे विकेट फेकून तो संघातले आपले स्थान गमावणार हे निश्चित! खरे म्हणजे तो आपल्या संघासाठी ब्ल्यू चिप आहे.

विराट कोहलीचे शतक हुकले याचे दुःख क्रिकेट रसिकांना निश्चितपणे झाले, पण नासिर हुसेन म्हणतो त्याप्रमाणे विश्वचषक महत्त्वाचा आहे, वैयक्तिक विक्रम नाही आणि विराटचे ४९ वे शतक आणि त्यापुढे काही शतके भविष्यात होणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे निष्कारण शतक हुकण्याचा शोक करण्यापेक्षा भारतीय क्रीडारसिकांनी आपल्या देशाने विश्वचषक जिंकावा म्हणून प्रार्थना करावी.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com