Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याअफगाणिस्तानचा 'दे धक्का'!

अफगाणिस्तानचा ‘दे धक्का’!

स्वतःचे बलस्थान विचारात न घेता दुसऱ्याच्या शक्तीस्थानाचा विचार केल्यास काय होते,याचे पाकिस्तान-अफगाणिस्तान सामना हे उत्तम उदाहरण ठरावे. या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने पाठलाग करताना चांगला खेळ केला. श्रीलंकेविरुद्ध तर त्यांनी साडेतीनशे धावा चेज करून सामना जिंकला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ते पराभूत झाले खरे, पण एका क्षणी त्यांनी सामना जिंकल्यासारखाच होता. पाठलाग करताना निर्णायक क्षणी त्यांचे सैन्य बिथरले. थोडक्यात, या स्पर्धेत त्यांचे पाठलाग करायचे रेकॉर्ड स्ट्राँग आहे. तरीही नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारण्याऐवजी फलंदाजी घ्यायचा निर्णय बाबरने का घेतला असेल? कदाचित चेपोकची खेळपट्टी दुसऱ्या सत्रात फिरकीला जास्त साथ देईल, असे त्याला वाटले असावे, पण त्यापेक्षाही खरी भीती असावी ती अफगाणिस्तानच्या चार स्पिनरच्या ४० षटकांची! त्यामुळे प्रथम फलंदाजी घ्यावी जेव्हा चेंडू फारसा स्पिन होणार नाही.

- Advertisement -

भरपूर धावा काढाव्यात आणि त्यातल्या त्यात कमजोर असणाऱ्या अफगाणिस्तानच्या फलंदाजीची नंतर परीक्षा घ्यावी, असा विचार त्याने केला असावा, पण झाले भलतेच. पाकिस्तानने शेवटच्या हाणामारीच्या षटकात चांगल्या धावा केल्या आणि भरपूर फटकेबाजी केली म्हणून २८३ धावांचा पल्ला त्यांनी गाठला. त्या क्षणी तरी हा पल्ला पुरेसा वाटत होता, पण अफगाणिस्तान फलंदाजीला उतरले आणि त्यांनी खेळाचा नक्शाच बदलून टाकला.

त्यांनी जबरदस्त सलामी दिली आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. पाकिस्तान विरुद्ध ८ विकेटने सामना जिंकणे ही मोठीच कामगिरी आहे. नेहमी गोलंदाजांच्या जीवावर सामना जिंकणारा अफगाणिस्तान आता पाठलाग करीत, तोही मोठा चेज करीत पाकिस्तानसारख्या चांगल्या गोलंदाजीचा समाचार घेत सामना जिंकतो ही निश्चित भरीव कामगिरी आहे. त्यांचा संघ कसा प्रगतीपथावर चालला आहे याचे हे सुरेख उदाहरण!

गेल्या काही महिन्यांत त्यांची फलंदाजी चांगलीच ऑर्गनाइज झाली आहे. त्यांचा बचाव सुधारला आहे. शॉट सिलेक्शन उत्तम झाले आहे. अफगाणिस्तान वन-डे क्रिकेट टी-२० सारखे खेळायचे. आता ते वेटींग गेम खेळतात. ही सुधारणा घडवून आणण्याचे मोठे श्रेय जोनाथन ट्रॉटला जाते. अफगाणिस्तानला कागदावर का होईना, उपांत्य फेरी गाठायची संधी आहे.

तशी ती पाकिस्तानला पण आहे, पण दिवसेंदिवस त्यांचा पाय खोलात चालला आहे.चेंडू स्पिन होत असताना त्यांच्या स्पिनरना एकही विकेट मिळाली नाही हे त्यांना चांगलेच खटकेल. शिवाय झेल सोडायच्या साथीच्या रोगाने त्यांना चांगलेच सतावले आहे. एक इफ्तेकार सोडला तर अष्टपैलू म्हणून कोणीच योगदान देत नाही. बाबर आझम धावा फक्त जमवतोय, पण त्यात त्याची हुकूमत दिसत नाही. थोडक्यात, मिट्ट काळोखातून त्यांना प्रकाशाकडे वाटचाल करायची आहे. पाकिस्तान संघाची अवस्था त्यांच्या देशाच्या कोसळलेल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे बिकट झाली आहे

– डॉ अरुण स्वादी

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या