
सिन्नर । वार्ताहर Sinnar
नायगाव (Naigaon )रस्त्यावरील जायगाव घाटातील ( Jaigaon Ghat)एका धोकादायक वळणावर दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने पडलेल्या भगदाडामुळे अपघाची शक्यता निर्माण होत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त होत आहे.
सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर 24 तास वाहनांची वर्दळ असते. मात्र, या रस्त्याची झालेली दुरवस्था बघता हा रस्ता सध्या मृत्यूच्या सापळा बनतो आहे. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले होते. मात्र, तेही अर्धवट करण्यात आल्याने पुन्हा या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरत आहे. नायगाव खोर्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जायगाव घाटातील एका धोकादायक वळणावरील अर्धा रस्ताच खचून गेला होता. तेव्हापासून येथील वाहतूक धोकादायक बनली आहे.
या खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाला मुहुर्त मिळत नसल्याने या वळणावर अपघात होऊन एखाद्याचा प्राण गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का असा सवाल प्रवासी करत आहेत. अनेकदा तक्रारी करुही रस्ता दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
तसेच रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकांचे अपघात झाले आहेत. खड्डयांबरोबरच रस्त्यावरील दोन्ही बाजुच्या साईडपट्टयाही खचून गेल्याने प्रवाशांच्या जीवाशी एकप्रकारे खेळ सुरु आहे. या रस्त्याची दुरुस्ती करुन त्वरीत साईडपट्टया बुजवण्याची मागणी जायगाव, नायगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.