खिचडी शिजवायला तांदूळच नाही

विद्यार्थ्यांना कोरडा शिधा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर
खिचडी शिजवायला तांदूळच नाही

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शालेय पोषण आहार योजनेतून (school nutrition diet plan ) शिजवण्यात येणार्‍या खिचडीसाठी ( Khichadi ) ज्या काळात वाहतूकदाराची नेमणूक नव्हती त्या 174 दिवसांच्या खिचडीला विद्यार्थी मुकले म्हणून त्यापोटी कोरडा शिधा देण्याचा निर्णय सरकारी पातळीवरून झाला आहे. मात्र, मागणीप्रमाणे तांदूळच उपलब्ध होत नसल्याचे (Rice is not available as per the demand ) समोर आले आहे. यासाठी 1500 मेट्रिक टन तांदळाची मागणी नोंदवण्यात आली असून तुटवड्यामुळे हा तांदूळ उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतरच प्राप्त होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शाळांसह महापालिका, नगरपालिका तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे एकूण साडेसहा लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत.

गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून मात्र हा आहार मिळणे बंद झाले आहे. तांदूळ तसेच धान्यादी मालाची वाहतूक करण्यासाठी वाहतूकदाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. सरकारी पातळीवरून विलंब झाल्याचे प्रमुख कारण त्यामागे सांगण्यात आले. आता कुठे महिनाभरापूर्वी वाहतूकदाराची नेमणूक केली असली तरी अद्यापही सगळ्याच विद्यार्थ्यांंना पोषण आहार मिळत नसल्याचे आढळून आले आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे पोषण आहारासाठी लागणारा तांदूळ, डाळ, धान्यादी माल आदी कोरडा शिधा विद्यार्थ्यांना दिला गेला. हा माल शाळांपर्यंत पोहचविण्यासाठी वाहतूकदाराची नेमणूक सरकारी पातळीवरून केली जाते.

आधीच्या वाहतूकदाराचा करार जुलै 2021 पर्यंत होता. तोपर्यंत त्याने तांदूळ आणि धान्यादी मालाचा पुरवठा केल्याने विद्यार्थ्यापर्यंत कोरडा शिधा पोहचला. वाहतूकदाराच नसल्याने ऑगस्टपासून मात्र कोरडा शिधाही मिळाला नाही. खिचडीची चव विद्यार्थ्यांंना चाखता आली नाही.

ज्या काळात पोषण आहाराच्या खिचडीपासून विद्यार्थी वंचित राहिले. त्या ऑगस्ट 2021 ते मार्च 2022 या 174 दिवसांचा तांदूळ आणि धान्यादी माल कोरडा शिधा म्हणून विद्यार्थ्यांना देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी 1500 मेट्रिक टन तांदूळाची गरज असून तशी मागणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नोंदविली आहे.

प्रत्यक्षात मात्र संपूर्ण राज्यभरातच तांदळाची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मागणी नोंदवूनही एवढा तांदूळ काही मिळालाच नाही. हा तांदूळ उपलब्ध होण्यास नेमका किती कालावधी लागेल, याबाबत शिक्षण विभाग ठामपणे सांगू शकत नाही.

कारण, अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी नोंदविण्यात आल्याने केंद्र सरकारही अवाक् झाले आहे. त्यावर विचारमंथन सुरू असून संबंधितांना मागणी वाढण्यामागचे कारण पटवून दिले जात आहे. खात्री पटल्यानंतरच तांदळाचा पुरवठा होईल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा कोरडा शिधा उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतच मिळेल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com