काँग्रेसमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण

तीन दिवसीय चिंतन शिबिरातील निर्णय
काँग्रेसमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण

उदयपूर । वृत्तसंस्था ( Udaipur )

काँग्रेसमध्ये ( Congress Party ) आता एससी/एसटी आणि ओबीसी समाजासाठी 50 टक्के आरक्षण ( Reservation) असेल, असा निर्णय राजस्थानातील उदयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिरात घेण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील एक मोठा वर्ग गेल्या अनेक दिवसांपासून पक्षसंघटनेत एससी/एसटी आणि ओबीसी समाजासाठी 50 टक्के आरक्षणाची मागणी करत होता. चिंतन शिबिराच्या दुसर्‍या दिवशी पक्षाचे नेते के. राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणासाठी पक्षात संघटनात्मक बदलांना मान्यता देण्यात आली आहे.

एवढेच नाही तर सामाजिक न्याय आणि सशक्तीकरणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या कमिटीने आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीसमोर हा प्रस्ताव सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय पक्षात सामाजिक न्याय सल्लागार परिषदेचीही स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती काँग्रेस अध्यक्षांसमोर सामाजिक मुद्दे ठेवेल आणि त्यांना सल्ला देईल, असे सांगण्यात येत आहे.

याशिवाय सामाजिक स्तरावर दुर्बल घटकांसाठी सहा महिन्यांत एकवेळा काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होईल. उदयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराचा रविवारी तिसरा दिवस आहे. येथे दोन दिवस वेगवेगळ्या समित्यांमध्ये जे निर्णय घेतले जातील ते रविवारी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीसमोर ठेवले जातील. यानंतर या निर्णयांवर काँग्रेस वर्किंग कमिटी अंतिम निर्णय घेईल.

पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का

पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यानच जाखड आणि काँग्रेस पक्षात मतभेद निर्माण झाले होते. अखेर जाखड यांनी फेसबुक लाईव्ह करत पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. त्यांनी पक्षाला गुडबाय म्हणत, अशा पद्धतीने चिंतन शिबिर आयोजित करून काहीही होणार नसल्याचा सल्ला दिला आहे.

Related Stories

No stories found.