अकरा बालकांची बालमजुरीतून मुक्तता

अकरा बालकांची बालमजुरीतून मुक्तता

घोटी | जाकीर शेख Ghoti

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) उभाडेवाडी( Ubhadevadi ) येथील कातकरी वस्तीवरील आदिवासी मुलांना अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारी आणि बालमजुरी करण्यासाठी पाठविले जात असल्याची तसेच या बालकांचा शारिरीक छळ होत असल्याची गंभीर बाब येथील बालिका गौरी आगीवले हिच्या मृत्यूनंतर उघडकीस झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

याबाबत शिवसेना नेत्या निलम गोरे, यांच्याबरोबर चित्रा वाघ आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी भेट दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. यातील वेठबिगारी करणाऱ्या बालकांची शोधमोहीम राबविल्यानंतर आज तब्बल अकरा बालकांची वेठबिगारीतुन मुक्तता करण्यात आली. यात पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सहा तर संगमनेर हद्दीतून पाच बालकांचा समावेश आहे.

याबाबत वृत्त असे की, इगतपुरी तालुक्यातील उभाडेवाडी येथील आदिम कातकरी वस्तीवरील बालकांना नगर आणि लगतच्या जिल्ह्यातील मेंढपाळ ( धनगर ) समाज अल्पमोबदल्यात अल्पवयीन बालकांच्या पालकांना दारू आणि अल्प पैशाचे तसेच मेंढरूचे अमिष दाखवुन मेंढ्या चारण्यासाठी आणि राखण्यासाठी घेऊन जात असत. यातील गौरी आगीवले या बालिकेचा छळ करीत तिला चटके देत, गळा आवळीत जखमी केल्यानंतर जखमी अवस्थेत या मुलीला पालकांच्या दारात टाकून संशयित धनगरांने पलायन केले होते. या मुलीला श्रमजीवी संघटनेचे संजय शिंदे, सुनील वाघ, गोकुळ हिलम यांच्या पुढाकाराने घोटी ग्रामीण रुग्णालयासह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सातच दिवसात या मुलीचा मृत्यू झाला होता.

दरम्यान याबाबत श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, शिवसेना नेत्या निलम गोरे, यांच्या बरोबर चित्रा वाघ, आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे,माजी आमदार निर्मला गावित, आमदार हिरामण खोसकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेऊन सखोल चौकशीची मागणी केली होती.

शासन या घटनेमुळे खडबडून जागे झाले होते आणि या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. दरम्यान बालकामगार आणि वेठबिगारी करणाऱ्या इतर बालकांचा शोध घेऊन त्यांची मुक्तता करावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली होती. यानुसार आज पारनेर आणि संगमनेर पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवून अर्जुन देवराम गावित, वय १० रा. घोटी, विठ्ठल शांताराम किरकिरे, वय ११ रा. हर्सूले, अर्जुन रातीलाल, वय.१६ रा. मुरंबी, अर्जुन गोपाळ दिवे, वय.१३ रा. हर्सूले, गोट्या काळू वाघ, वय.८ रा. कांचनगाव, पूजा भगवान वाघ, वय.१० रा. घोटी, रवी काळू वाघ वय.११ रा. कांचनगाव, गणेश वय १६ रा. त्र्यंबकेश्वर, किरण वय.१७ रा. अस्वली स्टेशन, अभि वय १० रा. अस्वली स्टेशन, ज्ञानोबा, वय १३ रा. घोटी या अकरा बालकांची मुक्तता करून सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या उपस्थितीत घोटी पोलीस ठाण्यात पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com