वीजदेयकांसाठी ग्रामविकास विभागाकडे निधीची मागणी

जिल्हा परिषद प्रशासनाने लिहिले पत्र
वीजदेयकांसाठी ग्रामविकास विभागाकडे निधीची मागणी

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पथदीपांचे वीजदेयके मोठ्याप्रमाणात थकित असल्याने महावितरण कंपनीकडून ग्रामपंचायतींच्या वीज जोडण्या कापण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायतींच्या थकित वीज देयकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी लीना बनसोड यांनी ग्रामपंचायतींना वीजदेयके भरण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामविकास मंत्रालयाकडे केली आहे.

त्यानुसार एकट्या चांदवड तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींकडे पथदीपांची वीजदेयके थकित आहेत. याबाबत वृत्त प्रसिध्द होताच नंतर ग्रामपंचायत विभागाने ग्रामपंचायतींच्या थकित वीज देयकांचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. यासंदर्भात ग्रामविकास मंत्रालयास निधी उपलब्ध करण्याबाबतचे पत्र प्रशासनाने लिहिले आहे.

या पत्रानुसार २००३ पर्यंत ग्रामपंचायींची वीजदेयके देण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाकडून जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करून दिला जात असे. मात्र, निधीवेळेवर येत नसल्याने वीजदेयके भरण्यास उशीर होत असे. ही बाब लक्षात घेऊन २००३ पासून सरकारने थेट महावितरणला अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

त्यांनतर सरकारने २०१९ मध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या एकूण निधीतील २५ टक्के रक्कम महावितरणची देयके देण्यासाठी वापरण्याचे निर्देश दिले होेते. त्यानुसार जिल्हा परिषदेने अंमलबजावणीही केली. मात्र, त्यानंतर महावितरणच्या वीज देयकांचा मुद्दा जिल्हा परिषदेकडे आला नव्हता. मात्र, मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायतींकडे पथदीपांची मोठ्याप्रमाणावर थकबाकी असल्याचे समोर आले आहे. यामुळे महावितरण कंपनीने संबंधित ग्रामपंचायतींना वीज जोडणी तोडण्याचा इशारा दिला आहे.

बऱ्याच ग्रामपंचायतींकडून ग्रामपंचायत विभागाकडे या देयके अदा करण्याबाबत माहिती दिली जात आहे. यामुळे जिल्हा परिषदेने ग्रामविकास मंत्रालयास पत्र लिहून वीज देयकांसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com