Republic Day 2021 : जाणून घ्या संरक्षण मंत्रालयाकडून ‘चित्ररथास’ मान्यता कशी मिळते

आज २६ जानेवारी, भारताचा प्रजासत्ताक ७२ वा प्रजासत्ताकदिन. प्रजासत्ताक दिनी दरवर्षी राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात विविध राज्यांची संस्कृती, वैशिष्ट्ये दर्शवणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. आपण जाणून घेऊयात संरक्षण मंत्रालयाकडून ‘चित्ररथास’ मान्यता कशी मिळते..

प्रजासत्ताक दिनासाठी भारताने आमंत्रित केलेल्या विदेशी पाहुण्यांसह समस्त देशवासियांपुढे पारंपारिक नृत्य, गीत आणि कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक वारशाची झलक पेश करीत सामाजिक, आर्थिक तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाने आणि राज्यांनी साधलेल्या प्रगतीबरोबर देशाच्या इतिहासाचाच नव्हे तर भविष्याचाही वेध घेण्याचा प्रयत्न या चित्ररथांद्वारे केला जातो.

राजपथावरील चित्ररथांचा हा इतिहास सहा दशकांहून अधिक काळाचा आहे. १९५२ साली राजपथावर प्रजासत्ताक दिनाचे पथसंचलन सुरु झाले, तेव्हा त्यात पाच चित्ररथांचाच सहभाग होता. ते सर्व चित्ररथ केंद्र सरकारचेच होते. त्यावेळी राज्यांचीही संख्या फारशी नव्हती. हळूहळू प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा‍ऱ्या पथसंचलनाची लोकप्रियता वाढत गेली आणि १९५४ पासून या पथसंचलनात राज्यांचेही चित्ररथ भाग घेऊ लागले.

प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात जास्तीत जास्त सोळा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांना संधी मिळते. म्हणजे दरवर्षी निम्म्याहून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश वंचित राहतात. मात्र, दरवर्षी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे संरक्षण मंत्रालयाकडून पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी सर्वच २९ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांकडून चित्ररथांचे प्रस्ताव मागितले जातात.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चित्ररथांविषयी प्रस्ताव मागविणारे पत्र संरक्षण मंत्रालयाकडून राज्यांना प्राप्त होते. राज्यांना ऑगस्टअखेरपर्यंत प्रस्तावासोबत चित्ररथांचे मॉडेल आणि दीड पानांची संकल्पना सादर करायची असते. त्यावर सप्टेंबरमध्ये तज्ज्ञांच्या निवड समितीची पहिली बैठक होते. चित्ररथांसाठी अनेकदा मुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांकडून विषय सुचवितात. पण संकल्पनेला संमती देणे राज्याच्या नव्हे, तर संरक्षण मंत्रालयाच्या हाती असते.

संरक्षण मंत्रालयाचे सचिव अध्यक्ष असलेल्या साधारणपणे अकरा सदस्यांच्या या निवड समितीत साहित्य, संस्कृती, चित्रपट, वास्तु, नृत्य, नाट्य, कला अशा क्षेत्रातील अनुभवी आणि नावाजलेल्या सदस्यांचा समावेश असतो. निवड समितीच्या सदस्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतात. निवड समितीच्या निर्णायक ठरणा‍ऱ्या शेवटच्या तीन औपचारिक बैठकी होण्यापूर्वी चित्ररथांच्या प्रक्रियेला चालना देणा‍ऱ्या आठ-नऊ बैठका होतात. पहिल्या बैठकीत अर्ज करणा‍ऱ्या आयोजक राज्याचे निवासी आयुक्त आणि डिझाईनर यांना चित्ररथाच्या संकल्पनेसह चार-पाच विषय मांडायला सांगितले जाते. त्यातला एखादा विषय पसंत केला जातो किंवा निवड समितीने सुचविलेल्या दुस‍ऱ्या एखाद्या विषयावर काम करायला सांगितले जाते. त्यानंतर अर्जांची छाननी सुरु होते. नोव्हेंबर महिन्यात प्राथमिक फेरी होते.

सुरुवातीला ५० अर्ज आले असतील, तर पहिल्या फेरीत त्यांची छाननी करुन अर्जांची संख्या दुस‍ऱ्या फेरीत ३० ते ३५ पर्यंत घटविली जाते आणि तिस‍ऱ्या व अंतिम फेरीत जास्तीत जास्त २०-२१ चित्ररथांची निवड केली जाते. चित्रपट, साहित्य, छायाचित्रकार, नृत्य अशा विविध क्षेत्रातील नावाजलेल्या अभ्यासू आणि अनुभवी सदस्यांच्या नजरेतून तावून सुलाखून निघालेल्या प्रत्येक संकल्पनेची निवड होते. राजपथावर राज्यांना त्यांच्या राज्यांचे नृत्य सादर करावयाचे असते. त्यामुळे नृत्यावर अधिक भर दिला जातो आणि नावाजलेले नृत्य तज्ज्ञ आणि दिग्दर्शकांचा निवड समितीत प्राधान्याने समावेश करण्यात येतो. पंधरा ते सोळा राज्ये आणि केंद्राच्या मंत्रालयांचाही प्रस्ताव समावेश करायचा असल्यामुळे सलग तीन-चार वर्षे संधी मिळालेल्या राज्यांना विश्रांती देत विषयांचे वैविध्य टिकवून सर्व चित्ररथांची सर्वसामान्यपणे निवड केली जाते.

आपण मुख्य प्रवाहापासून वेगळे झालेलो नाही, ही भावना निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक पथसंचलनात ईशान्येकडील राज्ये तसेच जम्मू आणि काश्मीरचे चित्ररथ असले पाहिजेत, हे केंद्रातील प्रत्येक सरकारचे धोरणच आहे. समान संकल्पना असलेल्या राज्यांचे अर्ज फेटाळले जातात किंवा त्यांना दुसरा विषय सुचविला जातो. विषयाची निवड झाल्यानंतर वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन चित्ररथासाठी वापरले जाणारे साहित्य, यंत्रसामुग्रीसह बारीकसारीक तांत्रिक तपशील डिझाईन करणा‍ऱ्यांकडून घेऊन सादर केली जाते. चित्ररथांची निर्मिती करण्यासाठी निविदांच्या माध्यमातून शासकीय नियमांनुसार कंत्राट दिले जाते. राजपथावर अवतरणा‍ऱ्या प्रत्येक चित्ररथाला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुस‍ऱ्या आ​णि तिस‍ऱ्या आठवड्यात होणा‍ऱ्या अंतिम फेरीच्या सादरीकरणाच्या दिव्याला सामोरे जावे लागते. थ्री-डी सादरीकरण दुस‍ऱ्या फेरीत होते. चित्ररथाची निवडही दुस‍ऱ्या फेरीतच केली जाते. निवड समितीच्या सदस्यांची नावे, चित्ररथांची निवड आणि फेटाळल्या गेलेल्या दावेदारांची माहिती गुप्त ठेवली जाते. अंतिम फेरीत फेटाळलेल्या प्रस्तावावर फेरविचार करण्यासाठी राज्यांना अपील करण्याचीही संधी असते.

यावर्षी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ

यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये वारकरी संत व समकालीन संतांनी जाती व्यवस्था, विषमता आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवत समाज प्रबोधनाचे महान कार्य केले आहे. हीच संतपरंपरा दर्शवणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ८ फूट उंचीची आसनस्थ मूर्ती खास आकर्षण आहे. संत ज्ञानेश्वरांच्या मूर्ती समोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शवण्यात आला आहे.

चित्ररथाच्या मध्यभागी हिंदवी स्वराज्य संस्थात्मक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस झालेले संत तुकाराम महाराज यांच्या भेटवर आधारित ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे प्रत्येकी ८ फूट उंचीचे फिरते पुतळे आहेत. या चित्ररथावरील राज्यातील वारकरी संतांचे व भक्तांचे दैवत असणाऱ्या पांडुरंगाची कटेवर हात असणारी ८.५ फूट उंचीची लोभस मूर्ती भक्तीभावाचे मूर्तीमंत रुप घेऊन अवतरली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात ८ फूट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे. यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत. चित्ररथाच्या दोन्ही बाजुंना संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या मूर्ती उभारण्यात आल्या आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *