बालरोग तज्ज्ञ संघटनेचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर

कोविड कृती दलाची प्रतिबंधात्मक उपाययोजनावर चर्चा
बालरोग तज्ज्ञ संघटनेचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर

नाशिक । प्रतिनिधी

कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सोनवणे यांच्यासह काही ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञांच्या एक कृती दलाने मुलांमध्ये कोविड आजारासंबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना, आजाराची लक्षणे, या बाबतचा अहवाल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन त्यांना सादर केला.

अहवालात कोविड आजारासंबंधी तीव्रता कमी जास्त असताना करावयाचे उपचार, मुलांची मानसिक अवस्था ठीक राहण्याच्या दृष्टीने घेण्याची खबरदारी, गृह विलगिकरणात असताना नोंद ठेवण्याच्या गोष्टी अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा यात केली आहे. तसेच यामध्ये शाळा सुरू कराव्या लागतील आणि त्यावेळी घेण्याची खबरदारी याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी काही विचार, संकल्पना मांडत अहवालाबाबत चर्चा केली.

डॉ. रवींद्र सोनवणे यांनी नाशिक शहर आणि जिल्हा यातील, बालरुग्णांच्यासाठी उपलब्ध पायाभूत सुविधांची माहिती दिली. तसेच डॉ. पंकज गाजरे यांनी एकूण रुग्ण किती असतील किंवा काय सुविधा लागू शकतील याची कल्पना दिली. डॉ. मिलिंद भराडिया आणि डॉ. रमाकांत पाटील यांनी कोविड आणि कोविडेत्तर अशी काटेकोर विभागणी लहान मुलांमध्ये करणे व्यवहार्य नाही, हा मुद्दा मांडला. त्यासाठी कोविड साठीची सर्व खबरदारी घेऊन सर्व रुग्णालयांना त्यावर उपचार करण्याची परवानगी देणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आयएमए महाराष्ट्र राज्य कृती समिती अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांनी काही काळात विशेष काळजी घेऊन शाळा सुरू करणे कसे आवश्यक आणि शक्य आहे, या विषयी मत मांडले . बालरोग तज्ज्ञ संघटनेचे राज्य सचिव डॉ. सदाचार उजलांबकर यांनी ग्रामीण आणि निमशहरी भागातील डॉक्टरांचा राज्य कृती दलात समावेश असावा अशी मागणी केली. जिल्हाधिकारी यांनी आवश्यक औषधे, यंत्रसामुग्री यांचा अभ्यास करून माहिती सादर करण्यास सांगितले.

शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. पंकज गाजरे यांना त्यांनी या मोहिमेचे नेतृत्व करण्यास सांगितले आहे. त्यांची इन्सीडेट कंमाडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर कृती दलाचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी सुचवलेल्या काही गोष्टी सह शासनाला सादर केला जाईल. या कोविड कृती दलामध्ये अध्यक्ष आणि डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग चिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ.रवींद्र सोनवणे, डॉ.सदाचार उजळंबकर, डॉ.रमाकांत पाटील, डॉ.राजेंद्र कुलकर्णी माजी केंद्रीय उपाध्यक्ष डॉ.केदार माळवतकर, डॉ.शर्मिला कुलकर्णी, डॉ.वैभव पुस्तके, डॉ.मिलिंद भराडिया, डॉ.पंकज गाजरे, डॉ.संदीप वासनकर, डॉ.संजय आहेर, डॉ.सुशील पारख, डॉ.प्रशांत कुटे, डॉ.अमोल मुरकुटे, सह सचिव डॉ.अक्षय पाटील, खजिनदार डॉ.गौरव नेरकर आदी सदस्यांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com