
मुंबई | Mumbai
'महाभारत' या लोकप्रिय मालिकेतील शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेता गुफी पेंटल (Gufi Patel) यांचे आज सोमवारी ५ जुन रोजी निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील अंधेरीत असलेल्या रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचा सहकलाकार सुरेंद्र पाल यांनी अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला.
गुफी यांची तब्येत बिघडली तेव्हा ते फरिदाबादला होते. त्यांना प्रथम फरिदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर मुंबईत आणण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री टीना घईने त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता आणि चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले होते.
गेल्या १० दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. त्यामुळे ते लवकरच घरी परत येतील, अशी कुटुंबियांना आशा होती. काही वर्षांपासून ते हृदय आणि किडनी संबंधित आजाराने ग्रस्त होते". मात्र, गुफी पेंटल यांचे आज सकाळी 9.30 च्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, गुफी यांच्या सिनेकारकिर्दिबद्दल बोलायचं झालं तर गुफी यांनी १९७५ मध्ये 'रफू चक्कर'मधून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. ८० च्या दशकात अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसले. मात्र, गुफी यांना खरी ओळख १९८८ मध्ये बीआर चोप्रा (B.R. Chopara) यांच्या 'महाभारत' या सुपरहिट मालिकेतून मिळाली होती. या शोमध्ये त्यांनी शकुनी मामांची भूमिका साकारली होती. तर, स्टार भारतच्या 'जय कन्हैया लाल की' या मालिकेत गुफी यांनी शेवटचं काम केलं होतं.