रामकुंड ते रामसेतूपर्यंतचे सर्व अतिक्रमण हटवा

महापालिका आयुक्तांची अचानक गोदाघाटावर पाहणी
रामकुंड ते रामसेतूपर्यंतचे सर्व अतिक्रमण हटवा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासन रमेश पवार (Nashik Municipal Commissioner and Administrator Ramesh Pawar )यांनी अचानक गोदाघाट परिसरात पाहणी दौरा करून संपूर्ण परिसरातील अतिक्रमणे त्वरित जमीनदोस्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यानुसार आज (दि.6) शुक्रवारी सकाळपासून या ठिकाणी अतिक्रमण मोहीम (Encroachment campaign )राबविण्यात येणार आहे.

आयुक्तांनी गोदाघाट परिसरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल ंकंपनीच्या अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. याठिकाणी संथगतीने सुरू असलेली कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी तसेच सर्व प्रकारचे अस्ताव्यस्त साहित्य व्यवस्थित ठेवून ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले असतील तेथील मलबा हटविण्याचे आदेश दिले. दरम्यान, दैनिक देशदूतने याबाबत नुकतीच विशेष मालिका प्रसिध्द केली होती, त्याची दखल महापालिका आयुक्तांनी घेऊन स्मार्ट सिटी कंपनी अधिकार्‍यांंना तंबी दिल्याची देखील चर्चा होती.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्यासह अतिरिक्त आयुक्त करूणा डहाळे तसेच दोन्ही विभागाचे विभाग अधिकारी यांच्यासह स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी अचानक आज सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान रामकुंड ते रामसेतू पुलापर्यंत पाहणी करून सर्व परिसर मोकळे करण्याची सूचना केली.

महापालिकेत आयुक्त म्हणून आल्यापासून रमेश पवार यांचे रामकुंड परिसरावर लक्ष आहे. त्यांनी या ठिकाणी पायी दौरा करून पहिल्या टप्प्यात संपूर्ण परिसराची पाहणी केली, यानंतर रिक्षाने प्रवास करून अभ्यास केला. तसेच रामकुंड परिसरातील सर्व प्रकारचे अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, आज सायंकाळी अचानक त्यांनी रामकुंड पासून रामसेतू पुलापर्यंत पायी पाहणी दौरा करून गौरी पटांगण, देव मामलेदार, साईबाबा मंदिर, सांडवा देवी मंदिर परिसर तसेच दोन्ही तीरावरील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.

या संपूर्ण परिसरात फक्त पूजा साहित्य विक्री करणार्‍यांनाच परवानगी मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त इतरांना इथून हद्दपार करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश विभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले असून उद्या सकाळपासून या संपूर्ण परिसरात विशेष अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. अतिक्रमण मोहीम संपल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहे व अतिक्रमण झाल्यास सुरक्षा रक्षकांवर देखील कारवाई होणार आहे.

स्मार्ट सिटी अधिकार्‍यांना तंबी

पवित्र गंगाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. यातील ज्या ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत तेथील मलबा त्वरित हटविण्यात येऊन परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात यावे, अशा सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासन रमेश पवार यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना दिल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या नियोजन अभावी गंगाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. येथील लहान-लहान गल्ल्यांमध्ये देखील स्मार्ट सिटीच्या वतीने खोदकाम करून ते त्वरित पूर्ण करण्यात येत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत देशदूतच्या वतीने विशेष मालिका सुरू करण्यात आली होती. त्यानुसार आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी स्मार्ट सिटी कंपनीला चांगलीच तंबी दिली व कामांचा निपटारा त्वरित करण्याच्या सूचना करून नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या आदेश दिले.

Related Stories

No stories found.