अखेरी केंद्र सरकारने रेमडेसिवीरची निर्यात थांबवली

कालच नाशिकमध्ये झाले होते आंदोलन
रेमडेसिवीर
रेमडेसिवीर

नवी दिल्ली

देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यावेळी रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. शनिवारी नाशिकमध्ये त्यासाठी आंदोलन झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेमडेसिवीरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे देशातील पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये नियंत्रणात येत असलेला कोरोनाचा संसर्ग राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये मात्र सध्या वेगाने पसरत आहे. तो नियंत्रित करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय औषधोपचारांच्या पर्यायामध्ये रेमडेसिवीरचा वापर परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले आहे. राज्यामध्ये आतापर्यंत चार लाख सातशे दोन रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या अंदाजानुसार सध्या राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे साधारण रोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरू आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर एप्रिलअखेर दिवसाला दीड लाख इंजेक्शन्सची आवश्यकता भासू शकते. करोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय उपचारांमध्ये वापरात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने कुटुंबीयांची धावाधाव सुरु आहे. अशावेळी दुकानदार अव्वाच्या सव्वा किमतीने इंजेक्शन विकत आहे. यामुळे नाशिकमध्ये शनिवारी आंदोलन झाले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही हतबलता व्यक्त केली होती.

काय आहे रेमडेसिवीर?

रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर प्रभावी मानले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिड-19 रुग्णांवरचा प्रभावी उपाय असल्याचं म्हणत याची शिफारस केली होती. सिप्ला (मुंबई), हेट्रो हेल्थकेअर (हैद्राबाद), ज्युबीलियंट लाईफसायंन्सेस (दिल्ली), इलिया लेबोरेटरीज (अर्जेंटीना), डॉ. रेड्डीज (हैद्राबाद), झायडस् कॅडिला (अहमदाबाद) या सहा कंपन्यांची रेमडेसिवीर इंजेक्शन्स महाराष्ट्रात वापरली जात आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com