अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा

सोमवारपासून शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा होणार
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा

मुंबई । वृत्तसंस्था

परतीच्या पावसानें राज्यात प्रचंड धुमाकूळ घातला होता. अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानें पिकांचें मोठें नुकसान झालें होतें. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारनें केली होती.

अखेर त्यासंदर्भात निर्णय झाला असून, दिवाळी आधी म्हणजेच येत्या सोमवारपासून सरकारकडून शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.

राज्यात ऑक्टोबर महिन्यात प्रचंड पाऊस झाला. ऐन काढणीवर आलेली पिकें भुईसपाट झाली होती. अनेक भागात तर पिकेंच वाहून गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांनी विविध भागांचे दौरे केले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शक्य तितकी मदत राज्य सरकारकडून केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलें होतें. अखेर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या मदतीबद्दलची माहिती दिली. वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारनें शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचें वचन दिलें होतें. ते सरकार पूर्ण करत आहे. निवडणूक आयोगाला मदत वाटपासंदर्भात पत्र देण्यात आलें आहे. अशा प्रकरणात निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात होईल, असें वडेट्टीवार म्हणाले.

राज्यातील परतीच्या पावसानें अनेक भागात झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरे करत पाहणी केली होती. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांनी मदत करणार असल्याचें सांगत शेतकर्‍यांना धीर दिला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com