
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
जीएसटी ( GST ) परताव्याबाबत सातत्याने केंद्र सरकारकडे बोटे दाखवून जनतेची दिशाभूल करत ठाकरे सरकार आपल्या आर्थिक नियोजनातील ढिसाळपणाचे प्रदर्शन घडवू लागले असून जीएसटीचा मे महिन्यापर्यंतचा संपूर्ण परतावा (GST refund)केंद्राकडून मिळालेला असल्याने आता आकड्यांचा फसवा खेळ न करता पेट्रोल आणि डिझेवलरील राज्याचे कर ५० टक्क्यांनी कमी करून जनतेला दिलेले वचन पूर्ण करा, अशी मागणी भाजप प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP state chief spokesperson Keshav Upadhyay)यांनी बुधवारी येथे केली.
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील करात कपात केल्यानंतर महाराष्ट्रानेही जनतेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा होती. पण खोटी आकडेवारी फेकून जनतेची दिशाभूल करत ठाकरे सरकारने दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. त्या वेळी जीएसटी थकबाकीचे खोटे कारण सांगत सरकारने कर कपात करणे टाळले होते. आता मे अखेरपर्यंतची जीएसटी परताव्याची संपूर्ण रक्कम महाराष्ट्रास मिळालेली आहे. त्यामुळे जीएसटी परताव्याचे कारण देत जनतेची फसवणूक करण्याऐवजी वचनपूर्ती करावी, असे उपाध्ये म्हणाले.
बंद खोलीत कधीच न झालेल्या चर्चेचे भांडवल करीत व वडिलांना दिलेल्या वचनाचा कांगावा करीत महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करून सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने आता जनतेच्या अपेक्षांची उपेक्षा करू नये, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने ३१ मे रोजी मे अखेरपर्यंतची जीएसटी भरपाईची संपूर्ण रक्कम जारी केली. याद्वारे महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपये भरपाईपोटी मिळाले आहेत. तरीही, अद्याप १२ हजार कोटी रुपये येणे असल्याचा कांगावा करून जनतेची फसवणूक करणारे ठाकरे सरकार पेट्रोल डिझेलवरील कर कपात करण्याचे टाळत आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला.
मे अखेरपर्यंतची परताव्याची संपूर्ण रक्कम राज्याला मिळालेली असताना खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आकडेवारीचे दाखले देत ठाकरे सरकार आर्थिक व्यवस्थापनातील ढिसाळपणाचाच पुरावा देत आहे, अशी टीका त्यांनी केली.