२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी (Aanganwadi Workers )आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यंतरी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde ) यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर बैठक झाली.

या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना-समितींचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती (Recruitment )सुरु करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे केली. याशिवाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग, नवीन मोबाईल आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे शासनाने १०० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करुन संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना शिंदे यांनी यावेळी दिल्या. अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिल्या.

आढाव्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरविण्याच्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात येतील, असेही शिंदे यांनी सांग़ितले. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.

पोषण आहाराचा दर वाढविण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच त्यात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारने भाऊबीज दिल्याबद्दल आणि गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या बैठकीत पोषण ट्रॅकर ॲप, मानधनवाढ, रिक्त पदे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com