मनपाच्या नावाने नोकरभरती जाहिरात?

बेरोजगारांची फसवणूक होण्याची शक्यता
मनपाच्या नावाने नोकरभरती जाहिरात?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासनाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष योजनेअंतर्गत एकूण रिक्त पदांपैकी सुमारे 80 टक्के जागा भरण्याची मुभा स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली आहे. त्यामुळे मागील 24 वर्षात नाशिक महापालिकेत भरती न झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर भरती प्रक्रिया ( Recruitment in NMC) होण्याच्या हालचाली सुरू झाले आहे. भरती प्रक्रिया शासनाने ठरवून दिलेल्या एजन्सी मार्फत होणार असली तरी इंटरनेटवर या भरतीची अधिकृत जाहिरात झळकत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. तर हा फसवणुकीचा प्रकार तर नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्वरित याबाबत कारवाई करण्याची गरज आहे.

नाशिक महापालिकेत नोकरभरती होणार असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून आल्यामुळे इंटरनेटवर त्याचा फायदा घेण्याची तयारी काहींनी सुरू केल्याचे दिसून येत आहे. याबाबत काही वेबसाईटने जाहिराती टाकल्या असून त्यात क्लिक करा आणि ऑनलाइन अर्ज सादर करा, असे देखील म्हटले आहे. नाशिक महापालिकेत थेट नोकर भरतीची कोणत्याही प्रकारे अधिकृत जाहिरात निघालेली नसल्याचे समजते. शासनाने ठरवून दिलेल्या एजन्सी मार्फत भरती प्रक्रिया होणार असल्याचे यापूर्वीच आयुक्तांनी सांगितले आहे. मात्र इंटरनेटवर जाहिरात कशी आली त्याचा फायदा कोणाला होणार, अशा पद्धतीने त्यांची फसवणूक तर होणार नाही ना असे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वेळेत याकडे लक्ष द्यावे व बेरोजगारांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.

एजन्सीमार्फत भरती

नाशिक महापालिकेत मागील 24 वर्षांपासून नोकर भरतीची झालेली नाही तर दुसरीकडे दर महिन्याला सतत महापालिकेचे अधिकारी सेवक सेवानिवृत्त होत आहे. एकीकडे नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत आहे तर दुसरीकडे महापालिकेत मनुष्यबळाची कमी असल्यामुळे आहे त्या अधिकारी व सेवकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य शासनाने नोकर भरतीवरील निर्बंध हटवल्याने नाशिक महापालिकेत रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सी मार्फत मार्च 2023 पूर्वी नाशिक महापालिकेत महत्त्वाचे पदे भरले जाणार आहे. नाशिक महापालिकेने आरोग्यसह वैद्यकीय विभागातील अठ्ठावीस संवर्गातील 358 व अग्निशमनच्या आठ संवर्गातील 348 असे एकूण 706 पद भरण्याची तयारी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com